एकदा पहावं करून

नवे नाटक!
किती मेहेनत असते एखादे नाटक उभं करण्यात. नुसते संवाद पाठ करणे व व योग्य वळी फेकणे हा एक भाग झाला. पण इतर किती तरी अजून भाग आहेतच.
वेळो वेळी होणार्‍या तालिमी आणि त्यांना दर वेळी कमिटेडली जाणे. आपला रोल हा आपणच आहोत म्हणून मान्य करून त्यात एखाद्या सुरवंटासारखे शिरणे. तिथेच तालिमींया कोशात प्रयोगाचे सगळेकाही जमून येई पर्यंत वाट बघत थांबणे. आणि प्रयोगाच्या वेळी फुलपाखरू होऊन स्टेजवर भिरभिरणे. इतके काही सोपे वाटत नाही .
शिवाय अनेक इतर गोष्टींचा विचार करणे  आहेच, उदाहरणार्थ स्टेज वर माईक्स कुठे हवेत. कारण पात्रांनी अभिनयाच्या भरात येऊन जागेवरून दूर गेले की आवाज बोंबलणार. किंवा टाळ्या आणि हशे यांच्या जागा घेताना द्यायचा वेळ.  प्रेक्षकांची नस ओळखून त्यांना भावतील अशा संवादांवर भर.  मुळात 'योग्य असं' ना़टक हाती लागणं आणि सगळी मंडळी जमून येणं.

छ्या! एक नाटक बसवायचं म्हणजे हजार गोष्टी आहेत त्या मागे.

बाकी या हजार गोष्टी आणि सगळी मेहेनत जमून आल्या की मात्र जी काही मजा येते ती औरच आहे. कालचा  मेलबर्न मध्ये "एकदा पाहावं करून" असाच जमून आलेला प्रयोग. खूपच मजा आली बघायला. खरं तर अगदी साधा घिसापीटा नाटकाचा प्लॉट. दोन प्रेमी त्यांना लग्न करायचंय पण बाप लोक एकमेकांचे वैरी. मग एक एकमेकांची कुलंगडी काढून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न. शेवटी मनोमीलन.

पण इतका साधा पण विनोदाच्या अंगाने जाणारे नाटकाचे कथानक मंदार वैद्यने भन्नाटच बसवले. दिग्दर्शनातून संवादाच्या फेकीतून त्याने मस्त कलंदर बिनधास्त बाप्पा धरसोड असे काही उभे केले की प्रेक्षक अगदी फिदा! निलेश ने केलेला त्याच्या वयापेक्षा मोठा रोल व त्याचे प्रयोगभर बाळगलेले बेअरिंग मस्तच होते. म्हणजे अगदी एक प्रसंगात लाली इंदुरीकर या सो कॉल्ड तमासगीरीवर लट्टू झालेला बबनराव बाक्रे जे काही नाचतो ते परफेक्ट नाकासमोर चालणार्‍या पन्नाशीच्या माणसाचे आहे. आणि लाली इंदुरीकर उर्फ मंदाकिनी तर झकासच. तीच्या लाली इंदुरीकर च्या एंट्रीला काय टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या विचारूच नका. येताजाता उपदेश करणारा बाप्पाच नोकर, मल्हारराव असलं मस्तपैकी "ढगाला लागली कळं" म्हणत अगदी 'टायमिंग ने पॉझ' घेऊन एग्झीट घेतो.

बाकी बाबीताई चे पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत असणारे पात्र तर फक्त दोन आठवड्यात संवाद पाठ करून उभे केले होते त्या, अभिनेत्रीला सलाम.
बापांच्या पत्नी व भामाबाई एकदम झकास. बाकी सगळेच कलाकार, सरवटे, प्रेमी युगुल वगैरे त्या त्या रोल मध्ये अगदी येकदम फीट्ट बसून सोडले होते बगा!

सर्वच कलाकारांनी खूपच मेहेनत घेतलीय हे सगळीकडे दिसून येत होतं. संगीतकार मकरंद भागवत सकाळपासूनच येऊन त्यांच्या ऍडजस्ट्मेंट्स करत बसले होते असे कळले. त्यांनी संगीतही अगदीच मस्त निवडलं होतं. क्वचित प्रसंगी जरा लाउड झालं तरी या नाटकाची ती गरजच आहे असं म्हणायला हरकत नाही. मंदाकिनी फक्त पिस्तुलाची ऍक्शन करते तेव्हा गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू येणं हे मस्तंच बसलं होतं. लाइट्स परफेक्ट होते.
नेपथ्य, ड्रेपरी व त्याला केलेली मेहेनत अगदी जाणवत होती. एकूणच सगळं काही विसरून जाऊन मनसोक्त हसवणारं नाटक असं सार्थच वर्णन याचं होतं.

दुवा 

लहान मुलांनीही कोणतीही रसभंग होइलशी गडबड काल केली नाही हे विशेष. अर्थात याचे श्रेय संगीत व नाटक वेगवान ठेवण्यालाही द्यायलाच हवे. आपापली मुलंबाळं व्यवधानं, कुटूंब, नोकरी, व्यवसाय सांभाळून नाटकाच्या प्रेमापाई इतका सुंदर प्रयोग सादर करणार्‍या सर्वांचे अभिनंदन करावे तितके कमी आहे.

असो, कालचा दिवस मस्त गेला. शिट्या वाजवून वाजवून पार जीभ आणि बोटं दुखायला लागली माझी... :-)) तिकिटावर कलाकार व इतर काही माहिती असती तर मला इथे ती देता आली असती. असो. पुढच्या वेळी... :-)