हिंदुस्तान टाईम्सचे नवे संशोधन - रामायणात धृतराष्ट्र

गेली काही हजार वर्षे आपण अज्ञ भारतीय रामायणात राजा दशरथ व त्याच्या तीन
राण्या होत्या हे ऐकून-वाचून होतो. पण आपले हे घोर अज्ञान दूर करण्याचे
पुण्यकर्म मुंबईतील एक अग्रगण्य इंग्रजी वर्तमानपत्र 'हिंदुस्तान टाईम्स"
व त्यात लिहिणाऱ्या विदुषी शोनाली गांगुली यांनी Where is the magic?
या लेखात आज केले आहे. दूरदर्शनवरील नव्या रामायण मालिकेच्या संदर्भातील
लेखाच्या पहिल्याच वाक्यात 'राजा धृतराष्ट्र आणि त्याच्या तीन राण्या' असे
वाचून मी अडखळलो. अजून तेव्हढे वय झाले नाही म्हणून नाहीतर 'कवळी बाहेर
पडली' असेच लिहिले असते! आजकाल रामायण-महाभारताबद्दल तरुणांना फारसे माहीत
नसते हे वादापुरते गृहीत धरले तरीही कल्पनेची ही झेप सामान्य भारतीयांना
झेपण्यापलीकडची आहे . वर्तमानपत्रात बाय-लाइन मिळणे ही एके काळी
वार्ताहरांसाठी अभिमानाची बाब होती, त्यासाठी मेहनत व अभ्यास लागायचा.
हल्ली बाय-लाइन बहुधा खिरापतीप्रमाणे वाटतात. अशा 'लेखकांना' व त्यांनी
तोडलेले असले अकलेचे तारे छापणाऱ्या उच्चविद्याविभूषित संपादकांना शाहरुख
खानच्या येऊ घातलेल्या "पांचवी पास" या कार्यक्रमात पाठवावे काय?

ता.क. दुव्यावर टिचकी मारल्यावर लॉग-इन पान येईल. तिथे चकटफू नोंदणी केल्यावर तुमच्या ब्रौझरच्या ऍड्रेस बारमध्ये वरील दुवा डकवावा व एंटर दाबावे - लेख दिसेल. (मुंबई आवृत्तीच्या पान १५वर हा लेख सापडेल.)