तप

                    आज सात-साडेसातशे वर्षे झाली तरी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी जनमानसावर अधिराज्य गाजवत आली आहे. कारण ह ग्रंथ आहे अक्षरसाहित्यात समाविष्ट झालेला. नित्यनूतनता हा अक्षर साहित्याचा एक विशेष आहे. काळपुरुषावर मात करून वर्षानुवर्षे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे साहित्य थोडे असते. अशा थोड्या साहित्यातील एक ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. या ग्रंथात प्रकट झालेले चिरंतन स्वरूपाचे विचार आपल्याल सतत नवी प्रेरणा देत आसतात. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नव्हे तर ते धर्मकीर्तन आहे. ज्ञानदेवांच्या वग्विलासाने भगवंतांनी जी रूपरेषा मांडली तिला स्पष्टार्थकता प्राप्त झाली आहे.

                   भगवंतांनी सोळाव्या अध्यायात पहिल्या तीन श्लोकात दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या माणसाच्या अंगी आढळणाऱ्या सद्गुणांचे परिगणन केले आहे. अभय, दान, यज्ञ, आर्जव, सत्य, तप, अक्रोध, त्याग वगैरे सद्गुण मोक्षप्राप्तीस कारणीभूत होतात तर अज्ञान, दंभ, दर्प, पारुष्य, अभिमान, क्रोध हे दुर्गुण आसुरी संपत्तीच्या लोकांत आढळतात व ते त्यांना बंधनात पडतात. भगवंतांनी फक्त दैवी संपत्तीच्या गुणांची यादी सांगितली, पण ज्ञानदेवांनी त्याला स्पष्ट रूप दिले आहे. भगवंतांनी जे चित्र रेखाटले त्यात त्यांनी रंग भरले. असेच स्पष्ट रूप दिले आहे तप या सद्गुणाला.

                  तप म्हटले की, सर्वसंग परित्याग करून निर्जन ठिकणी योगसाधना करणाऱ्या तपस्वी मनुष्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तपाचरणाने सिद्धी प्राप्त झालेले मुनी, शाप - उ:शाप देण्याचे त्यांचे अलौकिक सामर्थ्य, वगैरे अनेक गोष्टी तपाचरणाभोवती गूढतेचे वलय निर्माण करतात. परंतु ज्ञानदेवांनी तपाला एक वेगळे परिमाण दिले आहे. सोळव्या अध्यायात तप यावर त्यांनी १०६ ते ११२ अशा ७ ओव्यांतच विवरण केले आहे. पण त्यातून तपचरणाची स्पष्ट कल्पना येते.

                    तपाचरणाचे त्यांनी तीन भाग केले आहेत. १) निष्काम कर्म २) इंद्रिय-निग्रह ३) आत्मानत्म-विवेक. निष्काम कर्म हा तपाचरणाचा पाया आहे तर आत्मानात्म-विवेक हा कळस आहे.

                    तरी दानें सर्वस्व देणे / वेंचणे ते व्यर्थ करणे / जैसे फळोनी स्वये सुकणे / ओषधींचे जेवी // १६ - १०६ //

  वनस्पती स्वतः फळ देऊन सुकते, त्याप्रमाणे दान वगैरे कर्मामधील फळाची आशा सोडायची, म्हणजेच कोणतेही कर्म फळाच्या अपेक्षेने करावयाचे नाही.

                    'कर्मफलमनुदिश्य न मन्दः अपि प्रवर्तते ' कर्माचे फळ मिळणार नसेल तर मंदबुद्धीचा मनुष्य सुद्धा कर्म करण्यास तयार होणार नाही. त्यामुळे 'जन्तुना यत्क्रियते कर्म तत्तत्कामस्य चेष्टितम ' ही येथील जगरहाटी आहे. परंतु अशी सकाम कर्मे बंध निर्माण करतात. त्या कर्माची बरी-वाईट कर्मफळे भोगावी लागतात. तेव्हा जन्ममरणाच्या रहाटगडग्यतून सुटून मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर निष्काम कर्म करण्याची सवय अंगी बणवली पाहिजे. निष्कामपणे कर्म केले की त्या कर्माचे फळ कर्त्याला चिकटत नाही. हेच निर्लेप कर्मयोगशास्त्र आहे. हा झाल तपाचरणाचा पहिला भाग.

                     तपाचरणाचा दुसरा भाग आहे इंद्रियनिग्रह.

                                  नाना धूपाचा अग्निप्रवेशु / कनकी तुकाचा नाशु / कां पितृपक्ष पोशिता ऱ्हासू / चंद्राचा जैसा // १६ - १०७ //

                                  तैसा स्वरूपाचिया प्रसरा / लागी प्राणेंद्रियशरीरा / आटणी करणे जे वीरा / तेचि तप //  १६ - १०८ //

                                 ज्ञानदेव म्हणतात की धूपाचा अग्नीत प्रवेश झाल्यावर धूप नाहीसा होतो, हिणकस सोन्याला शुद्ध करण्यामुळे त्याचे वजन कमी होते किंवा पितृपक्ष वाढत असतना चंद्र कमी होत जातो त्याप्रमाणे आत्मानुभवाच्या विकासाकरता प्राण, इंद्रिये, शरीर यांची आटणी करावयाची म्हणजे झिजवायची तेच तप होय.

                                 इंद्रियांना विषयंपासून आवरून धरणे म्हणजे तप.

                              '  ध्यायतो विषयांपुंसः -------- बुद्धिनाशातप्रणश्यति ' (गीता २ -६२, २-६३) यात भगवंतांनी विषयी मनुष्याच्या बुद्धीच नाश कसा होतो, त्याचा क्रम सांगितला आहे. नुसत्या विषयच्या चिंतनानेच विषयासक्ती, विषयांचा अभिलाष, विषयेच्छा पूर्ण झाली नाही की क्रोध, क्रोधामुळे अविवेक, आविवेकामुळे स्मृतिभ्रंश व स्मृतिभ्रंशामुळे बुद्धिनाश होऊन मनुष्याचा अध:पात होतो.

                               इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते / एतैर्विमोहयत्येष ज्ञानमवृत्य देहिनम //

                              इंद्रिये, मन व बुद्धी ही सर्व कामरूपी शत्रूची वसतिस्थाने आहेत. वासनांचा पगडा आधी इंद्रियांवर बसतो, इंद्रिये गुलाम झाली की त्याचा मनावर अंमल चालतो आणि मनही त्याच्या आधीन झाले की त्याचा पगडा बुद्धीवर बसतो व बुद्धी भ्रष्ट होते. म्हणून इंद्रियदमनाची आवश्यकता आहे. विषयांपासून मन आवरून धरून चित्त एकग्र करण्याचा अभ्यास करावयाचा म्हणजे तप. हा तपाचरणाचा दुसरा भाग झाला.

                              अथवा अनारिसे / तपाचे रूप जरी असे / तरी जाण जेवीं दुधीं हंसे / सूदली चाचू // १६ - १०९ //

                             तैसे देहजीवाचिये मिळणी / जो उदयजत सूये पाणी / तो विवेक अंतःकरणी / जागविजे // १६ - ११० //

                            हंस जसे पाणीमिश्रित दूध वेगेळे करून फक्त दूधाचे ग्रहण करतो, त्याप्रमाणे साधकाने देह हा अनात्म पदार्थ व आत्मा हे जरी एकत्र आले तरी आत्मा हा देहापासून भिन्न आहे हा विचार सतत जागृत ठेवावा. देहबुद्धी कमी होणे ही गोष्ट अवघड आहे. परंतु आत्मस्वरूपी बुद्धी स्थिर होत गेली की हळूहळू देहबुद्धीच संकोच होतो आणि जागृतीमध्ये निद्रेसकट स्वप्न नाहीसे होते त्याप्रमाणे आत्मजागृती आली की देहबुद्धी पूर्णपणे नाहीशी होते.

                              अशाप्रकारे तपाचरणात अंतर्भूत होणाऱ्या तीन गोष्टी ज्ञानदेवानी संगितल्या आहेत.