विदर्भातला शेतकरी..

शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे.

बळीराजा हा आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत.

तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे प्रामुख्याने ४ प्रकार
१) कोकणातला २) खानदेशातला ३) विदर्भातला ४) मावळ प्रांतातला.

कोकण प्रांतात पाऊस भरपुर पण पाणी साठवण्याची तंत्रे कमी त्यामुळे बहुतांश पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. नगदी पीके (ऊस, कापूस) नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांकडे मुळातच पैसा कमी (पैसा मुख्यत: आंबा बागायतदारांकडे). परिणामी अंथरुण पाहून पाय पसरायची प्रवृत्ती. खानदेशात पण पाण्याचे दुर्भिक्ष्य पण द्राक्ष, केळीने हात दिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र सुपीक आणि जलसंपन्न तसेच सत्ताधार्‍यांचे लाडके अपत्य. सत्ताधार्‍यांचे अनेक निर्णय मावळाला विशेषत: बारामतीला पूरक.

राहता राहिला विदर्भ. माझे विदर्भाबद्दलचे ज्ञान तोकडे आहे पण मी असे वाचले आहे की विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर कोकणी शेतकर्‍यापेक्षा बरी. पण सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च विशेषत: प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अपरंपार.

कोकणातली लग्ने, बारशी किंवा इतर विधी झेपेल तेव्हढ्या परिस्थितीत होतो. हुंडा व्यवहार कमी. तो पण सक्तीचा नव्हे. मुख्य म्हणजे त्यासाठी मोठ्या रकमेची कर्जे काढली जात नाहीत. मात्र विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच. परिणामी ह्या कर्जाच्या डोंगरामुळेच विदर्भात आत्महत्यांचे लोण.