..............................................
...पिकली पाने गळताना !
..............................................
हृदय आतुनी का हलते...पिकली पाने गळताना ?
मनात यें भलतेसलते...पिकली पाने गळताना !
उगाच का ही कातरता...उगाच का ही व्याकुळता ?
उगाच का डोळे मिटती...हात असे जुळता जुळता ?
उगाच का हे गलबलते...पिकली पाने गळताना ?
गतकाळाचे बन पिवळे... मलूल सळसळते सारे
आठवणींचे जग विखरे... उदास भिरभिरते वारे
दुःख कोणते मज सलते...पिकली पाने गळताना ?
विलय जुन्याचा होणे हा... नियमच आहे सृष्टीचा !
अर्थ तरीही उमगेना...पानगळीचा... वृष्टीचा !
मौन अंतरी कलकलते...पिकली पाने गळताना !
***
पहाट आहे म्हणून तर...भय न धरावे तिमिराचे !
वसंत येणारच आहे...संपणार दिन शिशिराचे !
हिरवेपण आत उमलते...पिकली पाने गळताना !
- प्रदीप कुलकर्णी
..............................................
रचनाकाल ः १ नोव्हेंबर २००२
..............................................