फसगत

काटा रुतला तुला तेव्हा
काहीच कसं खुपलं नाही?
सांदीकोपऱ्यात लपवलेलं
रडू कसं फुटलं नाही?

झळा बसून बसून तुझा
हात कसा जळला नाही?
किती जरी जपलास तरी
अश्रू का ओघळला नाही?

दाटून रडू आलं तेव्हा
बळेच हसून मागे सारलंस
तेव्हा हसू सुद्धा त्याच्याच मागे
कायमचं दडून बसलं

कळून सवरून सगळं केलंस
तुला वाटलं मी फसले---
नाही रे-- फसलास तू
---तुझे अंदाजच हुकले!

रचनाकाल : जानेवारी १९९५.