एक प्रयोग

.... विसरलो विसरायचे ...
 

ठरविले तेव्हाच होते मी तुला विसरायचे
आठवांत मग्न मी,  विसरलो विसरायचे

गंधलात, धुंदलात मयसभेत माझिया
आल्यावरि भानावर, अरे रे.. विसरायचे!

का म्हणुनी दुनियेचे दोष मला दाविसी
स्मरतो स्वतःचे;  दुसर्‍याचे ? विसरायचे !

लुकलुकती प्रखर नभी दीपक जरि तार्‍यांचे
ज्याविणा प्रकाश ना त्या तमा विसरायचे?

गुंतलात जरि जनहो कुंतलात माझिया
सोबत ही घटकाभर सारे मग विसरायचे..

पदोपदी पाऊल मी सांभाळुन टाकिले
दु:ख हे कि वय सरले,राहिले घसरायचे

लपवाया घाव खोल शपथ घालिसी मला
भिजले हे वस्त्र तुझे मी कसे विसरायचे !

*********************************
... विसरलो पसरायचे !

यत्न करुन नच जमले दु:ख हे विसरायचे                    
टाकुनिया जाल जळी, पसराया विसरायचे ?

खोकलात, शिंकलात भरसभेत माझिया
छापिल मज भाषण ते मी कसे विसरायचे ?

गळा-मिठीही मारिती, मैत्र सदा दाविती
भांडती नळावरि ते हे कसे विसरायचे !

लखलखती घटकाभर मम सदनी दीपक हे
भारनियमन जन्माचे, ते कसे विसरायचे!

गुरफटले का जन हे बंडलात माझिया
आमिष जरि व्याजाचे,मुद्दला विसरायचे?

ओली मम वस्त्रे  मी रोज पिळुन टाकितो
आशेवर, की येतील दिवस तू परतायचे !

लपवाया वय अपुले केश रंगविलेस तू
शुभ्र खुंट दाढीचे- असे कसे विसरायचे?

****************************