गुरुविण कोण दाखविल वाट ?

गुरुविण कोण दाखविल वाट ?
संवेदनाशील व्यक्तिमत्वच चाकोरीबाहेरील जीवनाचा विचार करू शकते. प्राप्त जीवनात काहीतरी करायचे आहे या ध्येयवादाने पछाडले गेलेले असे व्यक्तिमत्व मग गुरुच्या शोधास लागते.
एकदा खात्री झाली की आपणाला याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की मग नकळत गुरु-शिष्यांचे नाते निर्माण होते. प्रेम व भक्ती जागृत होते. श्रद्धा बसते. श्रद्धेमध्ये जबरदस्त शक्ती असते. आत्म-विश्वास निर्माण होतो. आणि नकळत शिष्याची मजल गुरुच्याही पुढे जाते.
गुरुपासून ज्ञानप्राप्ती करून घेत असता शिष्याची अभ्यासू वृत्ती वृद्धिंगत होत. पर्यायाने इच्छित ज्ञानाबरोबरच तदनुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो. शिष्याचे व्यक्तिमत्व बहरले जाते आणि मग नकळत जिज्ञासूंमध्ये चर्चा सुरू होते की,  श्री रामकृष्ण परमहंस मोठे की स्वामी विवेकानंद..................
जनार्दनस्वामी श्रेष्ठ की संत एकनाथ गुरु निवृत्तीनाथाची महती मोठी की संत ज्ञानेश्वर माउलीची ?
 खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आधी बी का आधी झाड... एवढे अवघड आहे.  गुरु आणि शिष्य यांचा मोठे पणा मोजायला कोणतेही व्यावहारिक परिमाण उपयोगी पडत नाही. पण त्यातील महत्त्वाचा मुद्दा एकच गुरुशिवाय ध्येयवादी व्यक्तिमत्वाला पर्याय नाही. मग असा गुरु भेटतो तेव्हा? कोठे? कसा? वगैरे वगैरे.
याचे उत्तर अगदी सोपे आहे. तुमच्या घरातही तुम्हांस आईच्या रूपाने, भाऊ अगर वडिलांच्या ज्ञानाने, शिक्षकांच्या ममतेने गुरुछत्र  लाभू शकते. क्रीडांगणावरील अगर रंगभूमीवरील अनुभवी कलाकार, हेही त्या क्षेत्रातील गुरुच होत.  लो. टिळक, म. गांधी, स्वा. सावरकर हे आजच्या अनेक राजकीय पुढाऱ्यांचे गुरुच होते. म्हणजे गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. तर जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबंध असू शकतो.
यासाठी संवेदनाशील व्यक्तिमत्वाला जरुरी आहे मनोनिग्रहाची, श्रद्धेची आणि भक्ती व प्रेमाची आवश्यकता आहे. चिकाटी व प्रामाणिकपणाची. या गुणांसह  डोळस व अभ्यासू दृष्टीने वाटचाल केल्यास योग्य गुरु लाभू शकेल. आणि मग ध्येयप्राप्ती दृष्टिपथात येऊ शकेल. आज समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात र्कीर्तिशिखरावर विराजमान झालेल्या व्यक्तीचा इतिहास पडताळून पाहता त्याच्या यशाचे रहस्य हे, हे त्याच्या अचूक गुरुप्राप्तीत असल्याचे आढळून येईल. आणि म्हणूनच हे सत्य आहे की ...........
गुरुविण कोण दाखविल वाट ?
आपला संजिव