यंदा एप्रिल फूल दोन एप्रिलला

मला आलेला एक विपत्र-पुढावा (email-forward)  ... हा इतिहास मजेदार वाटला म्हणून मनोगतींसाठी खास .. लेखकाचे नाव ठाऊक नाही ......

एप्रिल फूल ही फ्रेंचांची देणगी. फ्रान्समध्ये सुरू झालेली ही मूर्ख बनवण्याची परंपरा पुढे सर्व युरोपमध्ये आणि त्यानंतर जगभरात रुजली. परंतु काही ऐतिहासिक कागदपत्रातून खळबळजनक माहिती उघड झाल्यामुळे फ्रान्समध्येच या परंपरेला आता हादरा बसलाय. पॅरिसला खेटून असलेल्या लिंत्स खेड्यात एक एप्रिल अर्थात एप्रिल फूलचं सेलिब्रेशन दोन एप्रिलला व्हावं, यासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. ते यशस्वी होणार असल्याची चिन्हं असून भारतातही त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.

लिंत्समध्ये सुरू असलेल्या एक एप्रिलविरोधी आंदोलनाची मुळं युरोपच्या पाचशे वर्षांपूवीर्च्या इतिहासात आहेत. ज्युलिअन कॅलेण्डरमध्ये असलेल्या त्रुटी सुधारून १५८२ साली गेगरिअन कॅलेण्डरची सुरुवात होण्याआधी १८ वर्षांआधी फ्रान्समध्ये एक ऐतिहासिक घटना घडली. नवव्या चार्ल्सने एक जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस आहे असं जाहीर केलं. ऐतिहासिक अशासाठी की त्यापूर्वी १ एप्रिल ही तारीख वर्षाचा पहिला दिवस असल्याचं मानलं जाई. चार्ल्सच्या या निर्णयाला जबरदस्त विरोध झाला. पण अखेरीस बहुजनांची समजूत घालण्यात चार्ल्सला यश आलं. उरलेले जे आपल्या जुन्या परंपरेला चिकटून राहिले, त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी चार्ल्सने अजब युक्ती शोधून काढली. अशा लोकांना एक एप्रिलला खोडसाळ भेटी पाठवून त्यांची रेवडी उडवली जायची. एप्रिल फूलचं खूळ तेव्हापासून रूढ झालं.

गेली पाच दशकं चार्ल्सने सुरू केलेली परंपरा फ्रेंचांनी कुरवाळली. पण त्याच चार्ल्सचे आता लिंत्समध्ये पुतळे जाळले जात असल्याचं लाओला या फ्रंेच वृत्त एजन्सीने उघड केलं आहे. चार्ल्सविरुद्ध उसळलेल्या जनक्षोभाचं कारण मात्र फार विचित्र आहे. लिंत्समधील डोंगराळ प्रदेशातल्या गुहेत काही गुराख्यांना सापडलेली १३व्या शतकातली भुर्जपत्रं या संघर्षाच्या मुळाशी आहेत.

आज इंग्लंड हा फ्रान्सचा जवळचा मित्र असला तरी काहीशे वर्षांपूर्वी त्यांचं नातं साप-मुंगुसासारखं होतं. इसवी सन १२६४च्या सुरूवातीला गेक्स टोळ्यांच्या अधिपत्याखाली असलेलं इंग्लंड आणि कुर्झी टोळ्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या फ्रान्समध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष सतत १२ वर्षं सुरू होता. तीस हजार कुर्झी वीरांनी बलिदान केल्यानंतर फ्रान्स या युद्धात विजयी झाला. गुप्तलिपी आणि चिन्हशास्त्रातील तज्ज्ञ बेन मितराँ यांंनी लिंत्समधल्या गुहेत सापडलेल्या शेकडो भुर्जपत्राचा अभ्यास करून या संघर्षाचा गौरवशाली इतिहास प्रकाशात आणला. ग्रेक्स आक्रमकांवर झालेला हा विजय एक एप्रिल रोजी झाल्याचा दावा मितराँ यांनी केला आहे. फ्रेंच इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारख्या या दिवसाचं एप्रिल फूल असं विकृतीकरण करण्याच्या विरोेधात त्यांनी १२ फ्रेबुवारी २००७ पासून चळवळ सुरू केली. आधी फक्त लिंत्समध्ये सुरू असलेल्या या चळवळीला आता फ्रान्समधील शंभरावर कलाकार, विचारवंत आणि लेखकांनी नेपोलिअन फोरमची स्थापना करून नुकताच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे देशभरात यावर विचारमंथन सुरू असून एक एप्रिल ऐवजी दोन एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा करण्याची घोषणा या गटाने केली आहे.

फ्रान्समध्ये या घोषणेला मिळत असलेला पाठिंबा पाहता भारतातही त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. भारतातील काही संघटना फ्रेंच विचारवंताच्या या गटाला पाठिंबा देणारं पत्रक काढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कदाचित यंदाच्या वर्षापासूनच एप्रिल फूलचं सेलिब्रेशन दोन एप्रिलला होणार अशी चिन्हं आहेत.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.....

ही बातमी धादांत खोटी आहे. संपूर्णतया काल्पनिक. एक एप्रिलला एकमेकांना कुणीही गंडवतय.. बुरा न मानो....... एप्रिल फूल है..