पूर्वी ७ वाजता बातम्या हा एक माहितीपूर्णं कार्यक्रम म्हणून पाहिला जायचा. पूर्वी ७ ते ७.१५ यावेळेत पूर्ण दिवसभरातील सर्व महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा व्यवस्थितपणे घेतला जायचा. परंतु आताच्या २४ तास वृत्तवाहिन्यांमुळे तो एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून पाहिला जातो. आणि का नाही, आजकालच्या ठळक बातम्या ह्या लोकांच्या मनोरंजनासाठी इतक्या ठळक केल्या जातात की त्यातील माहिती हा मूलभूत अंग बाजूला राहतो आणि उरतो तो फक्त ठळकपणा!
पूर्वी ठळक बातम्यांच्या जागा घ्यायच्या त्या राजनैतिक, देशांतर्गत चालू असलेल्या घडामोडी, सीमेवरील युद्धांच्या खबऱ्या. पण एका पोलिस आयुक्ताचा कुत्रा हरवण्याने वृत्त वाहिन्यांना त्याचे एवढे दुःख होणे आणि त्याची ठळक बातमी करण्याइतपत संवेदनशील पणा वृत्त वाहिन्या दाखवतील असा विचार मी 'आज तक' (माफ करा- आज पर्यंत) कधी केला नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी श्री. अमिताभ बच्चन यांच्या तब्येती विषयी ची माहितीही अशीच एका वृत्त वाहिनी कडून मिळाली. तसा मी काही श्री. अमिताभ बच्चन यांचा टीकाकार नाही. माझी तेवढी पात्रताही नाही. मी हि इतरांप्रमाणे त्यांचा चाहता आहे. त्यांची तब्येत नेहमी ठणठणीत राहो हीच सदिच्छा. पण त्यांना तिकडे थंडी वाजल्याने इकडे सर्व वृत्तवाहिन्यांना शिंकाच सुरू झाल्या जणू, त्या वेळीस मला अंदाज आला की खरंच आजकालच्या वृत्त वाहिन्यांसारखेच वृत्ते हि आजकाल किती खाजगी होत चालली आहेत.
२४ तास वृत्ते देण्याचा ह्यांनी चंग बांधला असल्याने नसलेल्या गोष्टी तयार करून, त्यांना आवाजवी महत्त्व देऊन, त्यांना ठळक बनवून आणि भरीस भर म्हणून त्याच त्या बातम्या गोलाकार स्वरूपात फिरवून दाखवण्याचा हा प्रकार मला खरंच अतिशय दर्जाहीन वाटतो.
आपल्या कडील वृत्तवाहिन्यांनी आपली समाजाकडील जबाबदारी जाणून वृत्ते प्रदर्शित केलीत तर थोडी मदत होईल असे मला वाटते.
आपल्याला काय वाटते?