( ऋणनिर्देश : कवितेस उद्देशून लिहिलेल्या ह्या ओळी 'नसतेस घरी तू जेव्हा' ह्या अप्रतिम रचनेच्या लयीत आणि बाजाने बेतायचा प्रयत्न केला आहे. त्या सुंदर काव्यशिल्पाशी संबंधित सर्व गुणीजनांना नम्र अभिवादन करुन... )
मजसोबत तू असताना
संगे उठता-बसताना
संदर्भ रोजचा असतो,
पण अर्थ नवाच दिसतो
तू भुलवत मज गाताना
तव ताना ऐकवताना
मी कुणी वेगळा बनतो
नि:शब्दच मी गुणगुणतो
कधि जवळुन तू जाताना
वार्यागत झुळझुळताना
काळजामध्ये हुळहुळतो
मज स्पर्श हवाच असतो
दुरुनी मज तू बघताना
नि:श्वास मंद निघताना
मी तुझी प्रतीक्षा करतो
माझ्याही नकळत झुरतो
मज जवळी तू नसताना
तुज दुज्यासवे रमताना
पाहुनी जीव हुरहुरतो
शंकित मी उगाच होतो...
आठव मज तव येताना
अपुल्याशीच पुटपुटताना
वेडयांत काढती सारे
मज मीच शहाणा दिसतो !