धनगराची वाटणी

रामोजी धनगर आता खूप म्हातारा झाला होता. त्याला आपल्या मुलांची कायम काळजी वाटायची. आपल्या पश्चात मेंढ्यांच्या वाटणीवरून आपल्या मुलांमध्ये भांडणतंटा माजेल अशी त्याला कायम काळजी वाटायची. म्हणून एक दिवस त्याने आपल्या सगळ्या मुलांना आणि सुनांना बोलावले आणि सांगितले की मी सांगतो त्या प्रमाणे तुम्ही मेंढ्यांची वाटणी करा.

प्रथम त्याने आपल्या सर्वात मोठ्या मुलाला बोलावले आणि तो म्हणाला, "तू सर्वात मोठा आहेस तेव्हा तुला हव्या असतील तेवढ्या मेंढ्या तू घे, तू घेलत्यावर उरलेल्या मेंढ्यांपैकी एक नवमांश मेंढ्या तुझ्या बायकोला मिळतील".

मग दुसऱ्या मुलालाही त्याने तेच सांगितले, "उरलेल्या मेंढ्यांपैकी तुला हव्या असतील तेवढ्या मेंढ्या तू घे, तू घेलत्यावर उरलेल्या मेंढ्यांपैकी एक नवमांश मेंढ्या तुझ्या बायकोला मिळतील".

असे करीत करीत सर्वात धाकट्या मुलाची वेळ आली. तेव्हा रामोजी म्हणाला, "तुलाही तोच नियम लागू. पण जर का मेंढ्यांची संख्या पूर्ण नसेल तर आपल्या तबेल्यातील  घोड्यांपैकी काही तुला आणि तुझ्या बायकोला घे आणि इतर घोडे सगळ्या भावांत सारखे वाटून घ्या. पण एक घोडा दोन मेंढ्यांच्या किंमतीचा आहे हे लक्षात ठेव."

अश्याप्रकारे सर्व मुलांनी आणि त्यांच्या बायकांनी मेंढ्यांची आणि घोड्यांची वाटणी केली.

गंमत अशी की इतक्या क्लिष्ट पद्धतीने वाटणी करूनही, शेवटी सर्व मुलांच्या कुटुंबांच्या वाट्याला सारख्याच मेंढ्या आणि घोडे आले. १/९ मेंढ्या वेगळ्या करताना कधीही अपूर्णांक आले नाहीत. रामोजीच्या तबेल्यात एकूण सात घोडे होते.
आता तुम्ही सांगू शकाल का की रामोजीला एकूण किती मुले होती? आणि रामोजीकडे एकूण किती मेंढ्या होत्या आणि त्याची वाटणी वरिल पद्धतीनुसार कशी झाली?