शब्द सवयीचे असे का आज घोटाळून बसले
थेंब पानांवर तसे ते आज सांभाळून बसले.
लाट आवेगात आली भेटण्या सागरतीरी
पाउले भिजली परी ती लाट मी टाळून बसले.
कोसळावे कड्यांवरूनी सत्य निर्मळ जळ जसे
प्रवाही त्या भावनांना आज मी गाळून बसले.
ओळखीच्या प्रदेशाचे आंधळे जे काव्य होते
ठेच त्याला लागली अन स्वत्व कुरवाळून बसले.
ये पुन्हा तू पावसा, विखुरल्या मोत्यांपरी
सापडावे मग मला, ते रान तुज माळून बसले.
स्पंदनांना विसरूनी, सोसली मी मुग्धता
पेटवा ते मन आता जे त्यास ओशाळून बसले.