ट्रकवाले २

"संथ वाहते क्रुष्णामाई" अशी ओळ पाठीवर वागवत त्या क्रुष्णामाई प्रमाणेच संथ चालणाऱ्या ट्रकला ओवरटेक करून मी पुढे गेलो. बाजूने पास होताना "बोले तैसा चाले" ही उक्ती आठवल्याने त्या ट्रकच्या टायरला हात लावून नमस्कार करायचा मोह मी कसाबसा टाळला. ओतप्रोत भरणे म्हणजे काय ह्याचा योग्य नमुना असलेला आणि तारीख जवळ आलेल्या गर्भवती स्त्री प्रमाणे तो चालणारा तो ट्रक नि त्याचा चालक ह्यांना मनातल्या मनातच नमस्कार केला नि ढाब्याची वाट धरली.
दुसरा चहा संपवतोय इतक्यात ती क्रुष्णामाई आमच्या ढाब्याच्या अंगणातच डुलत डुलत अवतीर्ण झाली. त्या ट्रकला पाहून मला पुन्हा एक उपमा सुचली. गवळणीच्या कमरेवर डचमळणारी घागर.

ट्रक थांबला नि त्यातून एक किरकोळ शरीरयष्टीचा माणूस उतरला. उतरला म्हणजे त्याने दार उघडून उडी मारली. आत आल्या आल्या त्याने डोक्यावरची टोपी टेबलावर आपटली नि ओरडला 'ए परी, चाय आन रे'. ह्या परी शी समस्त ट्रकवाले आप-आपल्या मातृभाषेत बोलतात. आणि तो त्यांना त्याच्या हिंदीत उत्तरं देतो. त्याची हिंदी असं म्हटलं कारण तशी हिंदी तो नि त्याचा मालक सोडून दुसरं कुणीही बोलत नाही. ह्यानी नुसता चहा मागवूनही चहा सोबत परी ने बैदा रोटी पण आणून ठेवली.

---------------------

इट्टल...
विठ्ठल???...
इट्टल... इSSS ट्टSSS लSSS
बरं...
कुठचे?
माणगाव जवळ वेरली गाव हाय, तिथला...
काय करता?
माचीस द्या...

---------------------

वयाच्या १६ व्या वर्षी घर सोडून पळालो. आमचा बाप विडीच्या कारखान्यात सुपरवाईझर होता. त्याला मलाबी विड्या वळायला बसवायचं होतं. पन आपल्याला स्वोताचा धंदा करायचा होता. साला माझा बाप मर मर मरायचा नि महिन्याच्या शेवटी माने शेट १२० टिकल्या टिकवायचा. मी सांगलं, आपून फुकटचोट दुसऱ्यासाटी मरणार न्हाय. बाप उचकटला. नोकरीला लावल्यावर त्याला माझं लगीन करायचं होतं. मुलगीबी पाहीली होती. बक्कल हुंडा नि सायकल मिळणार होती. त्या पैशातून बईनीच्या लग्नाचं कर्ज उतरणार होतं. बापाला बोल्लो, मला कायतरी बनायचय, त्या शिवाय लगीन न्हाय. बापाने मार मार मारला. तेव्हाच ठरवलं इथनं पळायचं.

रात्री सगळी झोपल्यावर आई बापाला नमस्कार केला नि पिशवी घेऊन निघालो. घराच्या दरवाज्याजवळ पोचलो नी एकदम पोटात तुटल्या सारखं झालं. आईची कूस आटवू लागली. जत्रेत फिरवणारा बापाचा खांदा आठवला. एक वेळ मागे बघितलं. दोघंबी दमलेत आता. त्यांना सांभाळायचं सोडून मी त्यांना स्वतासाठी सोडून चाललोय म्हणून रडू फुटलं. थांबावसं वाटलं. पन मन आवरलं. आपला बाप नि आपन जिथे सडलो तिथे आपली पोरं सडणार न्हायत. डोळे पुसले. बाप अजून १५-२० वर्ष तरी खपत न्हाय. बापाच्या पायाला हात लावला नि म्हणालो 'मला १० वर्ष द्या बापू'. दारातनं बाहेर पडलो नि तडक धावायलाच लागलो. कुटे जायचं माहीत नवतं. जाता जाता चावडी वर झोपलेल्या गनप्याला सांगीतलं घर सोडून जातोय. सकाळी बापाला सांग.

---------------------

नगरला आलो. चार मईने हमाली केली. हाता पायाच्या काड्या होत्या. वजन झेपत नसे. ट्रकमदे माल टाकायचा नि गिऱ्याईका कडे उतरवून द्यायचा. २ फ़ेऱ्यांचे ४ आणे मिळत. पण झोपायला जागा व्हती. रोजची कमाई १ रुपया. पोटास पुरेना म्हणून रात्री रिक्षा चालवायला घेतली. पहिल्याच रात्री एका पोलीसाला भाडं मागीतलं म्हणून मला कस्टडीत घेऊन गेला. बाकावर बसवलं. कोपऱ्यात एका चोराला उभं केलं व्हतं. ह्या हवालदाराने सट्ट करून आवाज काढला त्याच्या कानाखाली. १७ वर्साचा सुद्धा नवतो मी. बाप बेता-बेतानं मारायचा. पन आमचा बाप पन सापळाच होता. लागायचं नाई काई. कानाखाली खाल्ल्यावर चोर रडाया लागला आनी ते बघून इथे मी लेंगा ओला केला. सगले हसाया लागले. आवाज ऐकून साहेब जागा झाला. दया आली त्याला माजी नि सोडलं मला.

---------------------
आम्ही कट्ट्यावर (आणि इतर ठिकाणी) खातो तसे इट्टल बोलत होता. न थांबता. जणू कुणी विचारायची वाट बघत असल्या सारखा. मी सुद्ध त्याला न थांबवता वाहू दिलं.
---------------------

तिथून एक दिवस मुंबई गाटली. पुन्हा हमाली नि रात्री रिक्षा. एक दिवस एक मानूस बसला. थोडं बोलनं झाल्यावर म्हनाला जास्त पैसे कमावायचे का? मी खूश. त्यानी कार्ड दिलं म्हनाला उद्या संध्याकाली ये. काय काम हाय म्हनल्यावर हसला नि बोल्ला आलास की सांगतो. कुलाब्यातली कुटली तरी बिल्डिंग व्हती. दुसऱ्या माल्यावर गेलो तर माज्या सारकी अजून ७-८ पोरं व्हती तिते. कुनालाच म्हायती न्हवतं का आलेत पन पैसे मिलनार होते. तवड्यात मला भेटलेला मानूस (मन्नू) आला. त्याच्या सोबत अजून ५-६ लोकं व्हती. त्यातला एक माज्या कडे पाऊन हसला. म्हनला चल. एका खोलीत घेऊन गेला. म्हनाला २०० देइन. म्हनलं द्या. त्याने शर्टाच्या खिशात २ नोटा कोंबल्या नि एक ग्लास देऊन म्हनाला 'आता हे पी'. त्यानंतर जाग आली तेवा पोलीस चौकीतल्या बाकावर होतो. नि ती सगली लोकं समोर जेल मंदी. समोर एक सायेब काय तरी लीत व्हता. म्हनाला 'वेलेवर आलो आमी म्हनून वाचलात'. उटला तो जागे वरून नि मन्नूला जेल मदून काडून दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. तितून त्याच्या वरडन्याचे आवाज येऊ लागले. नि सायेब पन मारता मारत ओरडत व्हता 'पोरं विकतोस साल्या भाडखऊ... थांब तुजी आता XXXXXXXXXX.... XXXXX.... XXXXX... नं २२० एक बांबू आन रे, दाखवतोच आता भXXला.
थोड्या वेलाने साहेब घामाघून होऊन बायेर आला. मी पायावर डोकं ठेऊन म्हनलो 'लई उपकार झाले सायेब'.

---------------------

त्याच सायेबाच्या वलखीने एका हाटेलात नोकरी लागली. २ वर्स तिथे नोकरी केली. रात्री रिक्शा होतीच. पैका जमा केला. थोडे पैसे उधार घेऊन स्वोताची रिक्शा घेतली. हाटेल वाला चांगला व्हता. त्याच्या वलखीने पोरांना शालेतून आना पोचवायचं काम मिलालं. बक्कल पैका मिलत व्हता. पन मला अजून पुडे जायाचं व्हतं. २ वर्सानी पुन्हा उधारी काढली, रिक्शा विकली नि एक लहान टेंपू घेतला जुना. नि त्यानंतर हलू हलू जम बसाया लागला. एका कंपनीकडे लावला टेंपू. खात्रीचं काम मिलालं. रात्री रिक्शा सुरुच होती. ३ वर्सानी त्या कंपनीचा मॅनेजर म्हनाला पाच वर्सासाटी लावत असशील तर तुला ट्रक साटी कंपनी कडून कर्ज मिलवून देतो. होता तो टेंपू विकला नि कर्ज घेऊन हा ट्रक घेतला.

ट्रक घेतला नि पयली गोस्ट केली म्हंजे गावाला गेलो. ट्रकवर आईचं नाव लिवलं व्हतं 'भाग्यलक्शुमी'. बापाला १० मागीतली होती, २ वर्स आधीच गेलो.

---------------------

१२ वर्स झाली आज ह्या गोस्टीला. ट्रक वरचं कर्ज बी फिटलंय नि ह्याच्या जीवावर अजून एक ट्रक बी घेतलाय. आता आई बाप माज्या सोबतच असतात. घरातून पलालो नसतो तर आज नि पन बापासोबतच विड्या वलत बसलो असतो.

---------------------

बरं येक सांगा पाव्हणं, तुमचं नाव काय???