प्रेमभंग - दुसरी बाजू

आमचे मित्र, श्री. मिलिंद फणसे, यांच्या प्रेमभंगाविषयी वाचून आम्हास फार वाईट वाटले. चार समजुतीच्या गोष्टी वहिनींना सांगून त्या दोघांच्या प्रेमाची घसरलेली गाडी परत रुळावर आणण्याकरीता आम्ही तडक वहिनींच्या घरी गेलो. परंतु तिथे आम्हाला जे कळले त्याने आम्हास आश्चर्याचा धक्काच बसला. मिलिंदरावांनी आपल्या कवितेत वस्तुस्थितीचे अतिशय एकांगी व एकतर्फी चित्रण केलेले आहे. किंबहुना जे घडले त्यास त्यांचीच वर्तणूक कारणीभूत आहे. सत्य परिस्थिती वहिनींच्याच शब्दात आपणा सर्वांच्यापुढे मांडत आहे. त्या म्हणतात :

चुंबने सगळ्यांस तो देऊन येतो
गूण, मेला, गावभर उधळून येतो

भेटते रस्त्यात जी कोणी तिला हा
एक नजरेनी कसा मापून येतो

का नसे माझे बरे लावण्य, मित्रा?
रोज दोस्ताची सखी पाहून येतो

तो जणू श्रीकृष्ण होतो सांजवेळी
गोपिकांशी रास तो खेळून येतो

मागते घरखर्च मी बाई विवाहित
कांक्षिणींना हा रसद पुरवून येतो

लागतो डोळा पहाटे मुष्किलीने
रात्रभर डोळा कुणा मारून येतो?!

रात्र मधुचंद्रातली ती पौर्णिमेची
हा तरीही उकिरडे फुंकून येतो!

वाटते की वीज कायमचीच जावी
हा दिवे नाहीतरी लावून येतो

शाश्वती देऊ नका त्या लोचटाची
सारखा कोणातरी मागून येतो

एकटी मी यापुढे असणार नाही
सोबतीला सवत तो घेऊन येतो...