पोहे, चहा, बटाटे...

प्रेरणा : कविवर्य सुरेश भट यांची नितांतसुंदर, अजर गझल "केव्हातरी पहाटे"

पोहे, चहा, बटाटे घेऊन आत गेली
पिठले चुकून मजला देऊन आत गेली

कळले मला न केव्हा फुटली बशी कपाची
कळले मला न केव्हा उचलून आत गेली!

सांगू तरी कसे मी वय नासक्या दुधाचे?
रोखून श्वास रबडी ठेवून आत गेली!

उदरात येत काही आवाज कावळ्यांचे...
बदमाश ताट माझे उचलून आत गेली!

पाडावयास आली माझ्याच दंतपंक्ती
मग बोळके मुखाचे बनवून आत गेली!

आता बशीत नाही ते पापलेट माझे...
(सामीष ताट माझे बदलून आत गेली)

अजुनी सुगंध येई खोलीस मोगऱ्याचा...
गंगावनास येथे विसरून आत गेली!