बघ कविता सुचते का?

मूळ कविता,
मुसळधार पाऊस, खिडकीत उभं राहून पाहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव,
तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो,
नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी
वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग,
पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढेल
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे,
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, तू मला आवडतेस
पण तूही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल,
ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे,
झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?

कवी,
सौमित्र

---------------------------------------------------------------------------
कविता सुचत नाही,मनोगतवर जाऊन पाहा
बघ कविता सुचते का?

फोरम वाचून बघ, वाचून बघ गाणी
शब्दांची कर जुळवा-जुळव
बघ कविता सुचते का?

तुषार जोशी, अमोल  यांच्या कविता वाचून घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, रस्त्यावर ये
तो गजबजलेला असेलच, तसाच traffic मध्ये उभा राहा
हॉर्न  वाजतील गाड्यांचे , बघ कविता सुचते का?

चालत राहा traffic सुटेपर्यंत , ते सुटणार नाहीच, शेवटी घरी ये
हात-पाय धुऊ नकोस, orkut चालू कर, पुन्हा त्याच मनोगतवर ये
आता कविता लिहिण्याचा प्रयत्न कर,
बघ कविता सुचते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड,
आई असेल, तिच्या हातातली पिशवी घे, भाजी ती स्वतःच ठेवेल
ती विचारेल तुला तुझ्या अवतारच कारण, तू म्हणं शब्द हरवलेत,
मग चारोळी कर, आईलाही ऐकव
ती ओवी गुणगुणेल, तू ती शांत ऐक
बघ कविता सुचते का?

मग रात्र होईल, ती तुझ्या स्वप्नात येईल, म्हणेल तू मला आवडतोस
पण तूही तसचं म्हणं,
ती छान हसेल, तुला शब्द सुचतील,
ती जायला निघेल, तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघ
बघ कविता सुचते का??

यानंतर तिच्या सौंदर्यावर कविता करायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा कलकलाट नुसताच ऐकण्याचा प्रयत्न कर,
यानंतर कवितेची वही उशीखाली घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर,
येत्या आठवड्यात एक दिवसतरी,
बघ कविता सुचते का??????