प्रवास

दीर्घ प्रवासी काही नवथर कुणि होते कसलेले
वृद्ध जोडपे शांत एक त्या खिडकीशी बसलेले
केस रुपेरी, प्रसन्न मुद्रा, बरेच सुरकुतलेले
कैक वादळे त्यांनि उन्हाळे असावे बघितलेले

पुढच्या थांब्यावरी घोळका तरुणाईचा शिरला,
अवखळ किल्बिल चित्कारांनी आसमंत भरला
सहलकरी ते प्रवास त्यांना नवलपरी हे सारे
सहप्रवासी त्रस्त बिचारे पेंगुळले होते सारे
...
त्याच प्रवासी मीही-ऐकुन,पाहुन चुकचुकलेला
विशी-सत्तरी मधला होतो, पन्नासा झुकलेला
सय गेल्याची,भय येत्याचे,वय ते अवघडलेले
काल-आजचे आणि उद्याचे प्रश्न मला पडलेले
...
'काय म्हणावे ह्या पोरांना' मी रागाने म्हटले
लख्ख हासुनी,मज कानी ते आजोबा पुटपुटले

'जरा आठवू दिवस आपले,होते भरकटलेले,
ढगांत डोके,जमिनीवरुनी पायही ते सुटलेले
ह्या चक्राच्या परिघावरचे बिन्दू आपण सारे
आज जिथे मी,उद्यास तुम्ही,परवा ते येणारे..'
...
समजुन गेलो,भान असावे सदैव या सत्याचे
अनित्य सारे येथे केवळ परिवर्तन नित्याचे !