गोष्ट पाच रुपड्यांची!

        आयुष्यात आपण लाखो(काही लोक तर कोट्यावधी) रुपयांची उलाढाल करतो तरीही एकादी अगदी क्षुल्लक रक्कम आपण मिळवलेली वा घालवलेली आपल्या जन्मभर लक्षात राहते.  माझ्या आयुष्यातही मी एकदा  मिळवलेले पाच रुपये माझ्या चांगले लक्षात आहेत.
             .     
            शाळेत असताना लहानपणापासून हस्तलिखित मासिक काढणे वगैरे उद्योग मी करीत असे. दोन तीन वर्षे तर शाळेत हस्तलिखित साप्ताहिक चालवण्याचा उपद्व्यापही मी केला होता. आणि त्यात बहुतांश लेख, कविता कथा लिहिंण्याचे काम अर्थात मलाच करावे लागे. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असतानाही कधीकधी  पांढऱ्यावर काळे करण्याचे माझी उबळ उसळी घ्यायची. आणि ती शमवण्यासाठी एक कथा मी लिहिली आणि माझ्या वाचनाचे वेड असणाऱ्या एका मित्रास दाखवली. त्याचा एक मित्र तर ती कथा वाचून चांगलाच प्रभावित झाला आणि त्याने ही कथा एकाद्या मासिकाकडे का पाठवत नाही असे मला विचारले पण तेवढे धैर्य न झाल्याने ती कथा तशीच माझ्या दप्तरात पडून राहिली. पुढे मी बी. ई. होऊन बऱ्याच वणवणीनंतर मला मिळालेली नोकरीही सुटली आणि अचानक माझे पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक भेटले, मी नोकरीच्या शोधात आहे म्हटल्यावर त्यानी मग कॊलेजात का येत नाहीस असा सहज प्रश्न केला, त्यावेळी ते औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख  होते. आणि त्यावेळी अभियंत्यांना नोकरी मिळणे अवघड जात असले तरी  अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करायला फारच कमी अभियंते मिळायचे त्यामुळे त्यांच्या आवाहनास साद देऊन मी अर्ज करताच त्यानी मला औरंगाबादला नेमणुकच देऊन टाकली.
          प्राध्यापकाची नोकरी जरा आरामशीर असल्याने माझ्या लेखनाच्या छंदाने पुन्हा उचल घेतली आणि त्यावेळी मला माझ्या जुन्या कथेची आठवण झाली. ती शोधून सुवाच्य अक्षरात लिहून मी त्यावेळी कथा प्रसिद्ध करण्यात अग्रेसर असणाऱ्या एका मासिकाकडे पाठवून दिली आणि मग ती गोष्ट पार विसरून गेलो. दोन तीन महिन्यांनी पोस्टमनने एकदम माझ्या हातात त्या मासिकाचा त्या महिन्याचा अंकच ठेवला आणि आश्चर्य म्हणजे त्यात चक्क माझी कथा छापून आली होती. अर्थात अनाहूत साहित्यास मोबदला दिला जात नाही या मासिकाच्या बाण्यास जागून संपादकांनी मला मोबदला देण्याचे टाळले होते.
           पण या गोष्टीचा एक फायदा झाला. त्याच मासिकात त्यांनी एक कथालेखन स्पर्धा जाहीर केली होती. ती एक पानी कथालेखन स्पर्धा होती. एका पानातच बसेल एवढ्याच म्हणजे जवळपास सातशे शब्दांची कथा लिहायचे ते आवाहन होते. आता माझी प्रतिभा बऱ्यापैकी जागृत झालेली असल्यामुळे मला सुचत असलेल्या कथेस एका पानात बसवून मी ती सुवाच्य अक्षरात लिहून त्या मासिकाकडे पाठवून दिली. बरेच दिवस झाले आणि केवळ आपली कथा प्रसिद्ध होते की नाही हे पाहण्यासाठी त्या मासिकाचा अंक विकत घेण्याचा आतबट्ट्याचा व्यवहार करण्याइतकी माझी अर्थिक परिस्थिती सुधारलेली नसल्यामुळे शिवाय यापूर्वी कथा प्रकाशित झालेला अंक घरी आलेला असल्यामुळे असेल माझा हरी च्या थाटात झाली प्रसिद्ध तर येइल अंक घरात अशा भ्रमात राहण्याचे मी पसंत केले.
           त्या काळात औरंगाबाद अगदी छोटे शहर होते अगदी मोठे खेडेच म्हणा ना! त्यामुळे एकाच क्षेत्रातील लोकांच्या सहजच ओळखी व्हायच्या. त्यामुळेच तेथील दुसऱ्या एका महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक माझे चांगले मित्र झाले होते.   त्यांचा धाकटा भाऊ   माझ्याबरोबर पुण्याच्या कॉलेजात शिकायला होता शिवाय त्यांच्या वडिलांचा आणि माझ्या वडिलांचाही स्नेहसंबंध होता हेही आणखी एक कारण असेल.  हे इंग्रजीचे प्राध्यापक असल्याने त्यांना साहित्यात बरीच रुची होती. त्यामुळे ते बरीच मासिके वाचायचे आणि विकत पण घ्यायचे. एक दिवस सहज त्यांची गाठ पडल्यावर ते मला म्हणू लागले " अहो तुमची कथा उगीच वाचली" ते ऐकून ते मागे प्रसिद्ध झालेल्या कथेविषयी बोलत आहेत असे वाटून मला फारसा आनंद झाला नाही. त्यानी कथा वाचल्याचे सांगितले नसते तरी काही हरकत नव्हती पण ती वाचून वर उगीच वाचली असा अभिप्राय   द्यावा याच सहाजिकच दुः ख झाले पण आता काय करणार? पण माझा पडलेला चेहरा बघून तेच पुढे म्हणाले "अहो उगीच म्हणजे उगीच या शीर्षकाची" आणि मग एकदम मला आठवण झाली की मी एकपानी कथास्पर्धेसाठी पाठवलेल्या कथेचे शीर्षकच " उगीच" असे होते. हे त्यांच पुढच बोलण ऐकून मात्र मला आनंद व्यक्त करावा की दु:ख काही समजेना कारण एकीकडे ती छापून आल्याचा आनंद होत होता तर दुसरीकडे ते मला कळवण्याचे तर राहोच पण तो अंकसुद्धा मला  पाठवण्याचे सौजन्य न दाखवणाऱ्या संपादकाविषयी माझ्या मनात संताप अगदी दाटून आला.
       " चांगली कथा आहे. " असा त्यांचा शेरा ऐकला . आता मी त्याना कसे सांगणार की त्या कथेचा अंकही मला आला नाही. शेवटी मी त्यांच्याकडूनच तो अंक घेऊन ती कथा डोळाभरून पाहिली, आणि खरेच त्या कथेला पाच रुपयाचे (त्या वेळच्या पाच रुपयाची किंमत आजच्या भावाने शंभर रुपये तरी होईल असो! )किरकोळ का होईना पारितोषिक मिळाल्याचा उल्लेख त्या अंकात केलेला होता.
        त्याच दिवशी तिरिमिरीने एका साध्या पोस्टकार्डावर त्या संपादकास पत्र लिहून मी माझा संताप व्यक्त केला आणि वर लिहिले
पारितोषिक लाउनी आम्हा कथा तू मागसी
आणि मिळता नकळता आम्हास त्या तू छापसी
नियतकालिक चालण्या काढसी क्लुप्त्या नव्या
राहू दे तव त्या कुणाला पाच रुपड्या रे हव्या
या माझ्या पत्राचा मात्र जमालगोट्यासारखा परिणाम होऊन उलट टपाली अंक आणि पाच रुपयाची मनिओर्डर आली आणि वर माझे अशाप्रकारचे वागणे मला साहित्यक्षेत्रात काही करायचे असल्यास योग्य नाही असा उपदेशामृताचा डोसही पडलो तरी नाक वरच अशा थाटात पाजायला संपादकमहाशय विसरले नाहीत. अर्थात आपण साहित्यक्षेत्रात काही विशेष कामगिरी करू असा माझा गैरसमज नसल्याने मी ते पाच रुपये आणि अंक माशाने गिळलेले माणिक मिळवल्याच्या थाटात जपून ठेवले.  

आजकाल बरेच लोक दिवाळी अंक काढताना याच क्लुप्तीचा वापर करतात.