..........................................
तुकोबांच्या शब्दांसोबत...!!
..........................................
आनंदाचे डोही आनंदतरंग
(तुकोबा, मी दंग दुःखातच!! )
भेटीलागी जीवा लागलीसे आस
(भेटताच त्रास होई मला!! )
असाध्य ते साध्य करिता सायास
(मला विनात्रास हवे सारे!! )
निंदकाचे घर असावे शेजारी
(त्याने माझ्या दारी येऊ नये!! )
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
(तुझा हात हाती नाही माझ्या!! )
आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने
(सुचेना प्रयत्ने एक ओळ!! )
आपुलिया बळें नाही मी बोलत
(मानही डोलत नाही स्वये!! )
रातंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग
(माझा पांड़ुरंग शस्त्रहीन!! )
याचसाठी केला होता अट्टहास
(दुबळ्यांचा घास घेईन मी!! )
आलिया भोगासी असावे सादर
(दुःखाचा आदर मी न करी!! )
चंदनाचे हात पायही चंदन
(करू का वंदन? दिसे माती!! )
ठेविले अनंते तैसेचि राहावे
(वीट मी न व्हावे विठू पायी!! )
माझिया जातीचे मज भेटो कोणी
(खाणार मी लोणी जातीचेच!! )
तुका म्हणे होय मनासी संवाद
(वादासाठी वाद घालीन मी!! )
तुका म्हणे केली सोपी पायवाट
(वाट ही सपाट चालवेना!! )
बुडते हे जन देखवेना डोळा
(किती होता भोळा, माझा तुका!! )
- प्रदीप कुलकर्णी
..........................................
सहवासकाल ः ६ जुलै १९९८
..........................................