पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर!

झाला बुवा एकदाचा तो बहुप्रतीक्षित घटस्फोट!
किती ग वाट बघायची त्यासाठी?
किती वेळा देव पाण्यात ठेवायचे? (त्यांना सर्दी-पडसंच नव्हे, आताशा न्युमोनिया पण व्हायला लागला होता... )
त्याच्या `बाहेरख्याली'पणाबद्दल तिनं जाहीर संशय घ्यायला सुरवात केलीच होती. परदेशी माणसांबरोबरचं लफडंही चव्हाट्यावर आणलं होतं. तरी त्याला काही शुद्ध नव्हती. त्याचं वेगळंच गणित सुरू होतं. त्याला घरचं अन्न गोड लागेनासं झालं होतं. बायकोने भरवलेलं आधी जे अमृत लागायचं, ते आता कडू जहर लागायला लागलं होतं. तुला घटस्फोट घ्यायचा तर घे, मी `बाहेरख्याली'पणा सोडणार नाही, असंच त्याला सुचवायचं होतं. पण तिने ते समजून घ्यायला एवढा का वेळ लावला, कुणास ठाऊक? कदाचित, तिचीही दुसरी सोय व्हायची होती. घटस्फोट घेतल्यानंतर घरच्यांना, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना काय सांगायचं, याची तयारी झाली नव्हती. त्यासाठी तिनं पाळलेले सरदार, मनसबदार कामाला लावले होते. कसल्या-कसल्या समित्या नेमल्या होत्या. त्यांचे अहवाल, आणि एकूण पटतील, अशी कारणं देऊन तिनं एकतर्फी घटस्फोट जाहीर करून टाकला.
इकडे `त्या'नं दुसरी तयारी करून ठेवलीच होती. आपल्या `बाहेरख्याली'पणाला अडविणार नाही, अशी दुसरी मुलगी हेरून ठेवली होती. ती देखील काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नव्हती....! तिनं आधी त्याला एकदा नकार दिला होता. एकदा त्यानं तिला झिडकारलं होतं. पण आता दोघांना गरज होती. `माय-बापां`च्या पाया पडायला पुढच्या वर्षी जोडीनंच गेलं, तर खेटरं तरी पडणार नाहीत, असं दोघांनाही वाटलं. मग झाली-गेली भांडण. विसरून दोघंही एकमेकांच्या गळ्यात हार घालून मोकळी झाली.
बरं, इकडे गुढग्याचं बाशिंग पार सुकून गेलेल्या दुसऱ्या वराचं दुःख निराळंच होतं. त्यालाही लग्नाची घाई होती. पण `त्या' दोघांचा घटस्फोट झाला, आणि त्याला दुसरी बायकोच मिळाली नाही, तर याचा चान्स लागणार होता. बिच्चारा! चार वर्षं वाट बघत थांबला होता. दरवेळी काहीतरी कुरबूर झाली, की याला वाटायचं, चला, झालाच घटस्फोट! पण छे! घरचेच कुणी काके-मामे उपटायचे, आणि मिटवायचे भांडण!
या वेळी मात्र तसं काही झालं नाही. घटस्फोटाची धमकी तिनं खरी करून दाखवली, आणि दुसऱ्या नवऱ्यालाही पुन्हा लग्नज्वर चढला.
खरं तर त्याचा नंबर पुढच्याच वर्षी येणारेय. आधीच्या जोडप्याच्या संसाराची थेरं बघून लोकांनी संधी दिली असती, त्यालाही. पण तेवढाही धीर नाहीये आता त्याला.!

स्वतः हाफचड्डी घालणाऱ्यांनी दुसऱ्याच्या लुंगीला हसू नये म्हणतात. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

(वरील लिखाणाचा दिल्लीतील काही घटनांशी संबंध आढळल्यास, तो निव्वळ योगायोग समजू नये! )
(शीर्षकाचाही एखाद्या'`मर्हाटी' चित्रपटाच्या शीर्षकाशी संबंध आढळल्यास, तो मात्र योगायोग समजावा. )