... जन्मवारीचा नको हा त्रास!

..................................................
...जन्मवारीचा नको हा त्रास!
..................................................

 
... पोळला मी जीव
का न यें तुज कीव?
शेवटी आलो तुझ्या दारात!
उंबऱ्याची ठेच
मी उभा येथेच
घे, नको घेऊ, मला तू आत!

हो जरासा धीट
सोड आता वीट
अन उराशी लाव माझे पाप!
तूच तू आधार...
का तुला मी भार?
तूच माझी माय, माझा बाप!

चंद्रभागा तीर
भक्त वेडापीर
राख आता राख माझी लाज!
मार किंवा तार
आर ने वा पार
लाव पुण्याई पणाला आज!

जीव ये रंजीस
होय कासावीस
सोडवी काचातुनी या प्राण!
ये, पुढे तू येच
जे हवे ते देच
आजवरच्या भक्तिची तुज आण!

काय झाली चूक?
का असा तू मूक?
ऐकसी टाहो... तरी तू शांत!
मी असा निरुपाय
मोकलोनी धाय
मी करू आता किती आकांत?

जाणवेना आंच
का तुला केव्हाच?
ही युगांची सोड आता झोप!
आत माझ्या आग
जाग, आता जाग
ऊठ आता, नीज ही आटोप!

हे युगांचे भोग
जीवघेणे रोग
आणखी आता नको रे, बास!
घे तुझ्या पदरात
घे तुझ्या उदरात
जन्मवारीचा नको हा त्रास!!

- प्रदीप कुलकर्णी

..................................................
रचनाकाल ः २५ नोव्हेंबर २००४
..................................................