साळसूद

काल केसुभाईंनी घेतलेल्या व्ही आर एस बद्दल वाचतानाच संसदेचे न्यूज अपडेट्स पाहिले आणि केसुभाईंच्याच जमिनीवर काही संसदीय नेत्यांचा 'आतला आवाज' आम्हाला असा ऐकू आला.


भिती वाटते, सदा वरून मज बघतो आहे
निष्ठुर 'तो' न्यायास तराजू  धरतो आहे

कानावरती शस्त्र लावले ह्याने माझ्या
'माझा आहे तुज पाठिंबा ' म्हणतो आहे

माझ्या खांद्यावर दोस्तांच्या किती बंदुका
जगा वाटते, नेमच माझा जमतो आहे

विरोधकांना पाडण्यास होते माझे जाळे
कसा कळे ना मीच त्यात गुरफटतो आहे

कोण मित्र वा पाठीराखा, रिपू कोणता?
'दले' तयांची पुन्हा पुन्हा आठवतो आहे

शब्द फिरवले, किती मारल्या मी कोलांट्या
थापा कुठल्या? सत्य काय? अडखळतो आहे

फिरून यावे याच पदावर मन म्हणता
आसूड जनांच्या हातीचा का दिसतो आहे?

नवे नवे मी कपट पटावर ठेवत जातो
साळसुदाचा आव तरी मज जमतो आहे!

करून माकड लोकशाहिचे, त्या नाचवता
निलाजरा डोंबारी मी बघ ठरतो आहे

--अदिती
(२१ जुलै २००८,
आषाढ वद्य ४, शके १९३०)

१ : हा तो म्हणजे आयडीवाला तो नव्हे. हा तर आकाशातला बाप!