आला श्रावण श्रावण घालू त्याचे का लोणचे
काव्य वाचन उद्याला एक कविता न सुचे
आला श्रावण श्रावण झाले सर्दीने बेजार
दमेकरी दादलाही रात्र रात्र खोके फार
आला श्रावण श्रावण सारे सण ना आराम
त्यात मंगळागौरीला झिम्मा फुगडी व्यायाम
आला श्रावण श्रावण सारे खड्डे नाही रस्ता
साऱ्या भाज्या महागल्या फक्त बैदा झाला सस्ता
आला श्रावण श्रावण लागे चिखल पँटीला
घासघासुनिया डाग कंबरेचा काटा ढिला
आला श्रावण श्रावण रोज नवा ड्रेस कोड
ऑफिसात फक्त माझे झाले मॅचिंग विजोड
आला श्रावण श्रावण पावसाची रिपरिप
घसरून पडले मी वाया गेली सारी ट्रीप
आला श्रावण श्रावण झोप नाही बिनघोर
फुगुनिया गच्च झाले नाही लागत डोअर
आला श्रावण श्रावण टेस्ट युनिटची उद्या
दहीहंडीच कशाला माझे डोके फोड गोंद्या
आला श्रावण श्रावण तरी भार नियमन
आकाशाच्या विजेखाली आता लिहिते कवन
छळुनिया एकदाचा गेला श्रावण श्रावण
तोंड गोडाने विटले फिश चिकन तू आण