घन अंधारातून धावत आला काळ
थांबला म्हणे, मज, "येतो का रे बाळ? "
ते काय मागुती राहून गेले माझे
आरशात पाहिले अज्ञाताचे ओझे
* * * *
अंधार फाडुनी धावत आल्या लाटा
क्षण चिंब जाहल्या वहिवटलेल्या वाटा
वहिवाट कुणाची जन्म कुणाचा म्रुत्यू
डोळ्यात उगवता सूर्य रिकाम्या खाटा
* * * * *
मी मलाच ठाउक होतो कधी, कधी अन नव्हतो
पण एक खरे की कधी तरी मी होतो
दुःखाचे लेणे लेउनी युगा युगांचे
पायाने थकल्या कशास कोठे जातो?
* * * *
अशोककुमार त्रिभुवन