जंगल मे मंगल -३

संदर्भ : जंगल मे मंगल - १ व २
हत्तींच्या गैरकारभारावर बहुसंख्य प्राणी फार नाराज होते. त्यातून हत्ती जी कांही चांगली कामे करू इच्छित होते त्यांत कोल्हे त्यांना अडचणी आणत होते. हत्तींना जे पर्याय होते त्यांनीही याआधी गोंधळ घातला असल्यामुळे सर्व प्राणी हतबल झाले होते. जंगलातली झाडी, कुरणे कमी झाली होती, पाण्याचे दुर्भिक्ष वाढत चालले होते, वाघांची दादागिरी इतकी वाढली होती की तेही सिंहांप्रमाणे, आपला सवतासुभा मागतात की काय अशी भीती वाटू लागली होती. सिंह जरी वरवर शांत झालेले दिसले तरी मधुनमधून ते आपली नखे परजत होते. मुख्य म्हणजे कुठल्याही गुन्ह्याबद्दल कुणाला शिक्षा होत नव्हती आणि त्यामुळे गुन्हेगार व अतिरेकी वृत्तीचे प्राणी निर्ढावले होते!
शाकाहारी प्राणी उपासमारीमुळे जेरीस आले होते तर मांसाहारी प्राणी रोडावलेल्या शाकाहारींमुळे कंटाळले होते. जंगलाचा कारभार सुधारण्याची नितांत गरज होती.
हत्तीयाने यावर बाकीच्या हत्तींशी विचारविनिमय करून बाहेरच्या माणसांची मदत घेण्याचे ठरवले. बहुसंख्य हत्तींना स्वतःची बुद्धी वापरण्याची संवयच राहिलेली नसल्यामुळे त्यांनी हत्तीयाच्या या निर्णयाला सोंडा उचलून संमती दर्शवली. कोल्हे संतापले व आपल्याला विश्वासात न घेता घेतलेल्या या निर्णयाला त्यांनी जोरदार विरोध केला. कदाचित माणसे आल्यास आपल्या लबाडीच्या मक्तेदारीला एक प्रतिस्पर्धी निर्माण होईल अशी त्यांना भीती वाटली असावी. माकडांना खरे तर माणसे जवळची. पण हत्तींना प्रत्येक गोष्टीतच विरोध करायचे असे 'चिंतनशिबिरांत' ठरलेले असल्यामुळे त्यांनी याला विरोध केला. शिवाय, उद्या सत्तेवर आल्यावर याच माणसांकडून अधिक लाभ पदरांत पाडून घ्यायचा, असा धूर्त विचारही त्यामागे होता. तरसांना या विषयी कोणती भूमिका घ्यावी याचे पटकन आकलन न झाल्यामुळे ती नुसतीच हंसत होती. पण लांडग्यांनी अनपेक्षितरीत्या हत्तींना मदत करायचे ठरवल्याने तरसे तात्काळ विरोधात गेली. बाकी अनेक अस्वले, गेंडे, रानरेडे, गवे वगैरे तटस्थ राहिले.
अशा तऱ्हेने हत्तींच्या विरुद्ध कोल्हे, माकडे, तरसे, वाघ व सिंह अशी विळ्याभोपळ्याची मोट बांधली गेली.
'माणसांच्या मदतीने या जंगलातल्या अंधःकाराचे पर्व संपेल', या आलंकारिक वाक्याचा शब्दशः अर्थ लावून मांसाहारी प्राणी चपापले. उजेडांत शाकाहारींची शिकार करायची तरी कशी, असा सूर लावून हा ठराव मांसाहारीविरोधी आहे असा प्रचार सुरू झाला. ठरावाला प्रचंड विरोध होत असल्याचे पाहून हत्तींनी सूज्ञपणे तो 'मतास' टाकायचे आवाहन केले. कारण मते आपल्याकडे कशी वळवायची या कलेत ते अनुभवी होते.
ठरलेल्या दिवशी ठराव मताला टाकण्याची महासभा सुरू झाली. कांही अभ्यासपूर्ण भाषणे सोडली तर, इतर कित्येक वक्ते प्राण्यांचा हा करमणुकीचा कार्यक्रम आहे, अशी समजूत झालेली दिसली. चारा खाऊन माजलेल्या एका गव्याने तर चौफेर टोलेबाजी केली. अनेक प्राण्यांनी मूळ विषयापासून भरकटून हत्तींवर तोंडसुख घेऊन आपली हौस भागवली. हत्तुलनेही असंबद्ध भाषणाची आपली प्रतिमा कायम राखली. कोल्हेकुई, तरसांचे भीषण हंसणे, हत्तींच्या तुताऱ्या यांनी आसमंत दणाणून गेला. या गोंधळातच मा़कडांनी, केळ्यांचे घड हातांत नाचवत बोलायला सुरवात केली. लांडग्यांनी हे आमिष आम्हाला दाखवले, असा त्यांचा आरोप होता. पण अनुभवी हत्तींनी तो गोंधळ लवकरच आटोक्यात आणला. हत्तींच्या हिकमतींमुळे सर्व विरोधक चारीमुंड्या चीत झाले आणि हत्तींचा पुन्हा एक कलंकित विजय झाला. अर्थातच हत्तींना तो कलंकित वाटत नव्हताच!
परंतू हत्तींच्या या आनंदाला लगेचच विरजण लागले. वख्वखलेल्या प्राण्यांनी जंगलभर ठिकठिकाणी छुपे हल्ले सुरू केले! त्यांत अनेक निरपराध प्राण्यांचा नेहमीप्रमाणेच बळी गेला. परिस्थिती गंभीर झाली, साऱ्या जंगलालाच 'बाहेरचा' धोका प्रकर्षाने जाणवू लागला. पण त्याचे गांभीर्य लक्षांत न घेता माकडे हत्तींवर आरोप करत सुटली. माकडे - लांडगे यांच्यात 'केळ्यांचा घड' प्रकरणावरून जुंपली होतीच. कोल्ह्यांनी या हल्ल्यांबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. तर हत्तींनी त्यांच्या नेहमीच्या संवयीप्रमाणे शाकाहारींनाच शांततेचा उपदेश केला.
थोडक्यांत 'माणसांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्ताच्या माणसांपर्यंत' हा वर्तुळाकार चाकोरीबद्ध प्रवास सर्व जंगलवासीयांच्या नशिबी होता. ते अभागी जीवही, निमूटपणे या रुढ चक्रात फिरतच राहिले!!!