कहर

चंद्र आहे बांधलेला चांदणीला
यौवनाच्या रूपसुंदर दावणीला

लाजली नाही सखी मी बोलताना
लाजला येऊन मुद्दा ऐरणीला

काय सांगू कहर हा झाला कशाने
ती जरा लववून गेली पापणीला

नाक अपरे, केव्हढा अन् राग त्यावर
शोभतो तोरा खरा छोट्या चणीला

काळकूटाने नको माखूस डोळे
विभ्रमी चाळा पुरेसा जीवणीला

खोड पाण्याची जुनी 'विक्षिप्त' आहे
जात आढ्याचे अखेरी वळचणीला