अशी चालले मी, किती चालले, किती दु:ख नेत्रांतुनी वाहिले,
किती श्रांत, भेगाळली पाउले रे, अजूनी किती चालणे राहिले..?
धरोनी तुझा हात हाती सख्या रे, जणू पुष्पशय्येवरी चालले,
अचानक परी, स्वप्न ते भंगले अन्, वाट्यास आले जिणे एकले..
संगीत ते नर्म ओठातले अन्, ते भाव डोळ्यातले कोवळे,
किती मी स्मरू, अन् कसे विस्मरू, सख्या चित्र जे अंतरी कोरले..?
तिथे, पार त्या, दूर क्षितिजावरी रे, नभांगण जिथे भूवरी वाकले,
तिथे नीलछायेतळी थांब प्रीतम, निळे स्वप्न नेत्रांत सांभाळिले....