हल्ली तिला स्वप्नं पडत नव्हती, असं नाही..
फक्त त्या स्वप्नांना केशरी-गुलाबी झाक राहीली नव्हती
वास्तवतेने त्यावर चढविलेल्या नव्या रंगाविषयी, फार तक्रार नव्हती तिची..
दिवसाची मोळी डोक्यावर चढवून सूर्य हाकारे मारत होता कधीचाच-
चुकार चमेली, वाऱ्याचा हात धरून, खिडकीत उभी रहायच्या प्रयत्नात होती..
उठली ती..
दिवसरातीच्या उठाठेवींची गाज मनात साठवत..
आरश्यातल्या रुसलेल्या सखीला हसते केले तिने; ही कला सहज जमायची तिला..
स्तब्ध रहाटाला हात दिला..
एका आडोश्याला चिमुकला जीव अंथरला होता..
तिच्या शंका, चिंता, सर्व काही बाळमुठींनी चोखत-
किती आश्वस्त होता तो!
रहाट चालूच राहणार होते..
चिमुकल्याच्या डोळ्यातली केशरी-गुलाबी स्वप्नं पाहत...
-चिन्नु