या घरट्यातून पिलू उडावे.... १

दिव्या डायनिंग टेबलवर वह्या-पुस्तकांचा ढिगारा पुढ्यात घेऊन बसली होती. प्रत्येक पुस्तकाला सुबकपणे कव्हर लावलं जात होतं. तिने कात्रीने कापलेले त्रिकोणी चिठोरे एका तालात तरंगत खाली पडत होते. अंशू ता चिट्योऱ्यांशी खेळत होता. कव्हर लावणं झाल्यावर दिव्या आणि अंशू वह्यापुस्तकांवर लेबल चिकटविणार होते. लेबल विलग करताना कागद जरासा तिरका फाटला गेला असता तरी दिव्याला तेवढ्यापुरती रुखरुख वाटली असती. सगळी लेबलं चिकटवून झाल्यावर दिव्याने आपल्या वेलांटीदार अक्षरांत अंशुचं नाव-वर्ग-विषय वगैरे तपशील लिहून काढले असते आणि मग त्या नीटस, सुरेख गठ्ठ्याकडे जरा कौतुकाने, जराशा अभिमानाने बघितले असते.

तिच्या आसपास, ती जाईल त्या खोलीत तो खेळत बसायचा. ती कामांत असायची तेव्हा तो त्याच्या कामात असायचा. भांडी-वाट्या-चमचे काहीही त्याला खेळायला पुरायचं. आत्ममग्नतेत आनंद शोधायचा वारसा ताने बरोबर उचलला होता. लहानसहान काम एक साधी सुबक कविताच बनून जायचं मग. दिव्या स्वतःच केलेली आमटी वाटीत घेऊन चाखत "वा! छान" म्हणत मान डोलवायची तेव्हाच अंशू, "आई, बघ वाट्यांचा टॉवेल किती शुंदल बनला" म्हणत आपल्यावरच खूश होत टाळ्या पिटायचा.

अंशू मुळातच स्वभावतः गोड व समजूतदार. मुलांना लाड नव्हे, भरपूर प्रेम मिळालं की त्यांना छान सुरक्षित वाटतं. मग ती शांत-समाधानी असतात, असं दिव्याचं म्हणणं. तिची बाहेरची कामं सुद्धा ती तो झोपलेला असताना उरकून यायची. रस्ता ओलांडतानादेखील शाळेत जाणाऱ्या मुलांकडे निरखून बघायची. त्यांचा चेहऱ्यावरच्या हरवलेल्या भावात कुठेतरी अंशुला शोधायचा प्रयत्न करायची. आणि आता हा अंशू दोन तास का होईना तिच्यापासून दूर जाणार होता. सकाळच्या वेळी तिच्या अधेमध्ये लुडबुडणार नव्हता. छोटीशी पोळी आपल्या गुबगुबीत हाताने थापणार नव्हता.

तिला आठवत होतं अगदी काल परवा ऐकल्यासारखं, "एकूण एक मुलं दाराकडे बघून सारखी रडत होती. तुमचा अंशुमन मात्र छान खेळला हं. अजिबात रडला नाही" ऐकताना वाटणारा अभिमान. त्याचबरोबर आपला मनाला नक्की काय बोचतंय ह्या विचारात शिरताना "अंशू आपल्याशिवाय चैन न रडता खेळला म्हणजे आपल्याला वाटलं होतं तेवढं अंशुला आपलं नसणं जाणवलं नाही तर" ह्याचा नव्यानं लागलेला शोध" आपल्यापसून दुरावत नसून स्वतंत्र व्यक्तित्व म्हणून आकारायला बघतो आहे, " ही तिने स्वा:ची घातलेली समजूत. आपणही ह्या विचारव्यापांत फार न गुंतता सोडून दिलेलं काम परत हातात घ्यावं का, ह्या विचारात पडलेली ती. पण दुसऱ्या दिवशी जाऊन बघते तो "आई" करत आपले बालहात पसरत तिच्या पोटाशी चिकटलेला अंशू. त्याचे लाल झालेले डोळे, न थांबणारा हुंदका. 'ह्यापेक्षा कालचं जास्त छान होतं, ' ह्याचा तिच्या मनाने पटकन दिलेला कौल. तिच्या नकळतच परत कामाला जाण्याचा विचार तिथेच थांबला.

मग तीन वर्षांचा असतांना ऑटोने शाळेत जाणारा अंशू. ऑटोवाल्याचं बोट धरून शाळेच्या युनिफॉर्ममध्ये ऐटीत पायऱ्या चढत येणारा आमंदी, बडबड्या अंशू. "आप अंशू की मम्मी हो ना? " होकारत मान हलवाअंना ह्या आपल्या नव्या ओळखीच कऊक मनांत साठवणारी दिव्या. आणि मग डबा अजिबात न खाण्याबद्दल सतत रागावणी आणि अध्येमध्ये अंशुला बसणाआ मार. त्याचं डबा न खाणं हा तिचा एकमेव पण सतत काळजीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. ऑटोवाले कसे खूप मुलं भरतात राँग साईड चालवतात, हे ऐकून काळजीत पडलेली ती दोघं. दिव्याला आठवतं ऑटोवाला कसा चालवतो, कुठल्या रस्त्याने जातो, आपल्या अंशुला किंवा इतर लहान मुलांना ऑटोत बसवून इतर कुठे जात तर नाही ना, हे बघायला ऑटोवाल्याच्या नकळत त्याच्या मागे अंतर ठेवून घरून शाळेत-शाळेतून घरी येणारी तो दोघं. कधी वर्तमानपत्रांत लहान मुलांबद्दल एखादी भयंकर वाईट बातमी-फोटो यायचा. दिव्या वरूणला फोन करायची. "अंशुला गाडीने घरी आणूया का रे शळेतून? " "का गं? " "विशेष नाही रे. पेपरमध्ये तो फोटो पाहिल्यापासूनुगीचच अस्वस्थ होतं आहे असं वाटलं, आपलं पिल्लू आपल्या जवळ हवं. "  "मलाही काहीसं वाटलं जरा ती बातमी वाचून. तू तयार हो. मी आलोच. "

आणि मग पुढची  दोन वर्ष बसवाल्याशी वाजलं म्हणून त्याचं अंशुला सोडणं, तिचं आणायला जाणं. पण ते छहान सुरक्षित होतं. आत अंशू पहिलीत गेला. शाळाही खूप लांब गेली. बसशिवाय पर्याय नाही. सकाळी अठला जाईल ते दुपारी चारला येईल पण निदान सुरक्षित आहे. अजूनही आपल्या हाताने नीट जेवत नाही.   "आपल्याला भूक लागली आहे हेच मुळी त्याला समजत नाही" ह्यावर दिव्याचा ठाम विश्वास.

त्यातल्या त्यात उचलायला हलकं दफ्तर घेऊन झालं. दफ्तराच्या आतला भार हलका करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही, ह्याची रुखरुख वाटून झाली. आतलं अन्न गरम राहिलं असा डबा, पाणी थंड राहिलं अशी वॉटरबॅग, युनिफॉर्म, बूट_मोजे, छोटी छत्री सगळं काळजीपूर्वक घेऊन झालं. अंशुकडून जेवणाचा उघडणं, बंद करणं, नीट बॅगेत ठेवणं, सगळी प्रात्यक्षिकं करून घेणं झालं. ह्या सगळ्यात कुठेतरी गहिवरतंच होतं.   "पिल्लू, नीट करशील नं रे सगळं? "  अंशूने एकच प्रश्न तीनदा विचारला की ओरडणारी दिव्या किमान दहावेळा विचारून चुकली होती.   "हप गं आई. तू काही काळजी करू नकोस. फक्त तुझा एक फोटो ठेव छानसा डायरीमध्ये. मला आठवण आली की मी बघेन. "    अंशू मोठ्यांसारखा सांगत होता.   दिव्याला मात्र शाळा बघून आलो त्या दिवशी अंशुने विचारलेले प्रश्नच मनात घोळत होते.   "बापरे! कित्ती मोठी शाळा आहे आई. मी हरवलो तर?   मी टॉयलेटमध्ये गेलो आणि मला माझी क्लासरूम सापडलीच नाही तर?   माझी बस आली की तू घ्यायला यायला उशीर तर करणार नाहीस नं आई? " एक ना दोन.

"छ्यॅ:, काय हा आपल्या मनाचा भित्रेपणा! हा अंशुला समजता कामा नये मुळीच. अशानं ते मूल निर्भय, आत्मविश्वासी वृत्तीचं कसं बनायचं?   आणि असा कुठे तो दूर जातो आहे? हे सर्व अपरिहार्य नाही का? आपलं पिल्लू थोडं थोडं उडायला शिकतं आहे आणि आपण आपल्या आंधळ्या प्रेमाचं ओझं लादून त्याचं उडणं आणखी कठिण करतो आहोत. "  दिव्याला मनोमन पटलं.   "अंशुची शाळेची वेळ इज इक्वल टू माझ्या कामाची वेळ".   आता काय काम करायचं ते जरा बघावं लागेल सोपं अजिबात नाहीये. गरज आहे तितकं मनापासून गुंतायचं, गरज नाही तिथे स्वतःला हलकेच सोडवून घ्यायचं आणि आपलं फक्त आपल्यासाठीच असणं एंजॉय करायचं.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंशुचं सगळं आवरून दिव्या-वरुण बसस्टॉपपर्यंत गेली.   दुरून शाळेची पिवळी बस येताना दिसली. अंशुचा चेहरा शांत पण कुतूहलपूर्ण होता. बस दिसताच त्याने चालण्याचा वेग जरा वाढवला.   दिव्याही मनाला सावरून त्याच्याकडे धावली.   "अंशू... " तिने खाली वाकून अंशुच्या कपाळावर ओठ टेकवले.   त्याचे मऊ केस कपाळावरून मागे सारले.   ते परत समोर भुरभुरले. एक क्षण तिचे मन खूप लोभावले.   पण झटकन ती स्वतःला सावरून म्हणाली, " अंशू सगळं छान होईल. खूप मित्र मिळतील तुला. पटकन चार वाजतील. मी इथेच तुला घ्यायला उभी असेन. ऑल द बेस्ट. "

जर हे जग माया आहे, मन मिथ्या आहे, तर इतक्या तरलपणे मनाच्या गाभ्यातून उठणाऱ्या भावनांना. कुणाचं आयुष्य घडविणाऱ्या - कुणाला आयुष्यातून उठविणाऱ्या ह्या मानवी भावनांना काय नाव असतं?   आता ही दिव्या आपलं रितं मन घेऊन घरी जाईल आणि आठ तासांनी परत इथेच येईल.   त्यावेळी तिच्या मनाच्या पोतडीत तिच्या बाळासाठी काय काय असेल?   स्वागत, उत्सुकता, अपेक्षा, आनंद, काळजी आणि काय काय! मला वाटतं ह्या सगळ्यातलं तिने आता थोडंथोडं स्वतःसाठी ठेवावं. स्वतःला स्वतःसाठी काही करावं अशी इच्छा तिला व्हावी.   त्या इच्छांना पंख फुटावे.   तिच्या आकाशात छोट्या अंशुचंही आकाश सामावून जावं.

दिव्या अंशुकडे अंगठा उंचावून म्हणत होती, "ऑल द बेस्ट पिल्लू".   अंशुने दिव्याकडे मान उंचावून बघितले आणि आत्मविश्वासाने हसून तो चालू लागला.   मी अंगठा उंचावून दिव्याकडे बघत म्हटलं, " ऑल द बेस्ट दिव्या. "  ती माझ्याकडे बघून अंशुसारखाच अंगठा उंचावून प्रसन्नपणे कधी हसेल याची वाट बघत मी तिथेच उभी राहिले.