हुकलेले गणित

गणिताची ही रीत सांगतो

दोन नि दोन चार बरोबर;

दोन नि दोन पाच हे चूक

दोन नि दोन तीन ही चूक ||

वेळच्या वेळी हातचा घे

वजाबाकीला सोपे पडेल;

वेळच्या वेळी चिन्ह बदल

भागाकाराला सोपे पडेल ||

चिन्ह बदलता येत नसेल तर

आकडा तरी जुळवून पाहा;

उभ्या घावाने दुभंगलेली

मने तरी जुळवून पाहा ||

वरवर जुळतिल दोन्ही मने

जरी पोचती घाव खोलवर;

हिरमुसल्या घावांच्या या जखमाही

गाती मारवा सांज मिटेस्तोवर ||