माझा पहिला रेडिओ

       आजकाल अभियांत्रिकीचा निकाल लागताच लग्नाळू उमेदवाराकडे अडलेल्या वधूपित्याची रांग लागावी तशा  निरनिराळ्या कंपन्यांकडून इंजिनियर झालेल्या मुलाना मागण्या यायला लागतात. कधीकधी या कंपन्या अगोदरच महाविद्यालयात जाऊन मुलाखती घेऊन भावी इंजिनियरना नेमणुकीची पत्रेही देऊन टाकतात. पण आम्ही इंजिनियर झालो त्यावेळचा काळ असा नव्हता.  त्यामुळे आम्हालाच निरनिराळ्या दैनिकात येणाऱ्या छोट्या मोठ्या जाहिराती वाचून आपल्या  माहितीसह अर्ज टाकून वाट पाहत बसावे लागायचे. महाविद्यालयात जाऊन मुलाखती घेण्याचे तर कंपन्या नावही घेत नसत. त्यावेळी बहुतांश कंपन्याना अभियंता ही एक चैनीची वस्तू असे वाटत होते की काय कुणास ठाउक!.
          मी आमच्या खेडेगावातील जवळजवळ पहिलाच  इंजिनियर असल्याने तेथे एरंडोऽपी द्रुमायते या न्यायाने भाव खात असलो तरी तिकडे कोठल्याही कंपनीचे नावही कुणास माहीत नव्हते,आणि दूर मुंबईत असणाऱ्या कंपन्यांना माझे नाव माहीत नव्हते. त्यामुळे लगेचच माझ्या बहिणीने मला मुंबईस तिच्याकडे नेले आणि तेथून नोकरीची खटपट करण्याचा सल्ला दिला. आणि सुदैवाने दोनतीन महिन्यातच एका बॉयलर कंपनीत कशी काय कोण जाणे मला प्रशिक्षणार्थी अभियंता (ऍप्रेंटिस इंजिनियर) म्हणून नेमणूक मिळाली. मी त्या दोन तीन महिन्याच्या काळात बऱ्याच मुलाखतींना गेलो होतो. त्यात मुंबईत त्याच वर्षी मॉन्सून अगदी वेळेवर दाखल होऊन अगदी अंगात आल्यासारखा बरसत होता त्यामुळे मुलाखतीस जाताना आपल्याला  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येतील का यापेक्षा मुलाखतीस उभा राहीपर्यंत माझे अंगावरचे कपडे कसे कोरडे राहतील याचीच काळजी मला जास्त होती अनेक कंपन्यात मुलाखतीला गेल्यामुळे  नेमणुकीचे पत्र येईपर्यंत त्या कंपनीचा ठावठिकाणा मी पार विसरून गेलो होतो.
      त्या वेळी शासनाने. नेहमीप्रमाणे आमच्याकडूनही अभियंता झाल्यावर शासकीय सेवेत काम करण्याचे करारपत्र घेतले होते पण त्या नुसार आम्हाला तशी नेमणूक देण्याचे बंधन मात्र  स्वत: वर लादून न घेता निरनिराळ्या कंपन्यांनाच त्यानी काही विशिष्ट प्रमाणात नव्याने उत्तीर्ण अभियंत्यांना प्रशिक्षणार्थी अभियंते म्हणून नेमण्याचे बंधन घालून आपली सोडवणूक करून घेतली होती, याच प्रकारची माझी नेमणूक होती. त्यामुळे मी पहिल्या दिवशी कामावर हजर राहताच तेथील एक प्रमुख वाटणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले, "हे पाहा आम्ही तुला काम सांगणार नाही, काम शोधायचे आणि ते करायचे" याचा काय अर्थ हे मला शेवटपर्यंत कळले नाही. म्हणजे काम शोधणे हेच काम होऊन बसले. माझा सगळा दिवस कंपनीत काम शोधण्यातच जाऊ लागला. ती बॉयलर उत्पादन करणारी कंपनी असून तेथे पॅकेज टाइप बॉयलर तयार होत.. बॉयलर उत्पादनात वेल्डिंग हा महत्वाचा भाग असे आणि त्यापूर्वी जे दोन भाग जोडायचे ते घासून तयार करायला लागायचे, त्यामुळे सगळ्या यंत्रशाळेत पोलादावर जोरात विद्युतघासणीचा आणि हातोड्याचा अगदी कानठळ्या बसवणारा आवाज यायचा. त्यामुळे एकमेकाशी बोलण्यासाठी अगदी घसा खरवडून बोलावे लागे. माझ्या वडिलांचे एक मित्र मला भेटायला फॅक्टरीत आले आणि तो आवाज ऐकून घरी परत गेले तेव्हा मी बहिरा होण्याची ग्वाही त्यांनी माझ्या आई वडिलांना दिली होती. अर्थात अशा वातावरणात मी नाइलाजानेच वावरत होतो.. काम न करता बसण्याचा मला कंटाळा आला तरी काम शोधण्याचीही जबाबदारी माझ्यावरच सोपवल्यामुळे आणि तीन महिन्यानंतर काम शोधण्याचा माझा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे कंपनीच्या एका संचालकाने मला बोलावून पुढील महिन्यापासून कंपनीला माझी जरुरी नाही असे गोड शब्दात सांगितले. या कंपनीत काम शोधत बसण्यापेक्षा इतरत्र काम असेल तेथेच जावे असा माझा प्रयत्न चालूच होता त्यामुळे एक तारखेपासून या खडखडाटात यावे लागणार नाही याचा मला आनंदच झाला.      
      मधल्या काळात पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मला शिकवणारे एक प्राध्यापक त्याच कंपनीचा बॉयलर खरेदी करण्याच्या कामासाठी आले असताना मला दिसले आणि मी त्यांच्याशी गप्पा मारताना त्यानी औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ते सध्या यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख आहेत आणि तेथे सह अधिव्याक्यात्याची जरुरी आहे असे सांगून मला जर योग्य वाटले तर अर्ज करायचा सल्ला दिला आणि तो मी लगेच अमलात आणला होता. त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांची इतकी कमतरता होती की माझी मुलाखतही न घेता मला एकदम नेमणुकीचे पत्रच माझ्या हातात पडले.
          औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नेमणुकीचे पत्र मिळताच मी निघण्याची तयारी सुरू केली इतका मी मुंबईच्या वास्तव्याला  कंटाळलो होतो. जाण्यापूर्वी मुंबईत माझा एक मित्र  सेंट्रल पी. डब्लू. डी. च्या  चर्चगेटजवळील ऒफिसमध्ये काम करत असे त्याची गाठ घ्यायला म्हणून गेलो. हा मित्र ऑफिसमध्ये काम करायला जायचा की चहा प्यायला आणि पाजायला याचा मला नेहमी पेच पडायचा मात्र त्या दिवशी त्याच्यासमोर एक गृहस्थ बसले होते आणि तो खरोखरच काही फायली समोर ठेऊन बसला होता. मला पाहताच त्याने माझे स्वागत केले आणि समोर बसलेल्या गृहस्थाकडे निर्देश करत मला म्हणाल "अरे हे बापटसाहेब. "  ते माझ्यापेक्षा सात आठ वर्षांनी मोठे असावेत आणि गोरे आणि घाऱ्या डोळ्याचे होते. चेहरा हसतमुख होता, मी त्यांना नमस्कार केला. आणि मित्राकडे वळून म्हणालो " अरे यादव, मला औरंगाबादला जॉब मिळालाय आणि उद्या परवा निघणार आहे हेच सांगायला आलो. " यावर यादवने " वा मग जमलच" असे उद्गार काढले आणि मी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहू लागल्यावर तो म्हणाला " अरे हे साहेब औरंगाबादलाच असतात. मोठे कॉंट्रक्टर आहेत आणि त्यांच्या कामाच्या बिलाची चौकशी करायला आलेत. तुला औरंगाबादला काही लागले तर मदत करतील" यावर बापटांनीही मान हलवत " अगदी निश्चित काहीही मदत लागली तर अवश्य सांगा" असे आश्वासन दिले. बहुतेक त्यांचे एकादे बिल पास करायची जबाबदारी त्यावेळी माझा मित्र संभाळत असावा.
         त्यावेळपर्यंत मी औरंगाबादचे फक्त नाव ऐकले होते. आमच्याकडे म्हणजे प. महाराष्ट्रात त्यावेळी ते मोगलाईत कोठे तरी आहे असे म्हटले जायचे. खर तर औरंगाबाद जुन्या निझाम स्टेट मध्ये होते आणि राज्य पुनर्रचनेनंतर मराठवाडा महाराष्ट्रात सामिल झाल्याने  १९५६ मध्ये ते महाराष्ट्रात आले होते. तेथे मुसलमानांची वस्ती खूप आहे आणि एकाद्या मुस्लीम मोहल्ल्यात आपल्याला राहावे लागेल आणि एकादी लैला आपल्यावर आशिक होईल अशा वेडपट कल्पना माझ्या डोक्यात मी गध्धेपंचविशीत असल्याचा परिणाम म्हणून होत्या.
          मला नेमणुकीचे पत्र  जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळाले आणि फेब्रुवारीची एक तारीख शनिवारी येत होती तेव्हा आपण  सोमवारी कामावर रुजू व्हावे असे मी ठरवले. त्यामुळे मी रविवारी संध्याकाळच्या गाडीने निघालो. मुंबईस मी बहिणीकडे राहत असल्याने माझे स्वत:चे सामान अगदीच किरकोळ म्हणजे एक पत्र्याची बॅग भरेल एवढीच होते,, कारण अजून सूटकेसचा जमाना माझ्यापर्यंत आला नव्हता. मुंबईहून अलाहाबाद व्हाया नागपूर जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो.   आयुष्यात पहिल्यांदाच अगदी परक्या ठिकाणी मी एकटा निघाल्यामुळे बहिणीला बरेच गंहिवरून आले   तिच्या परीने तिने मुंबईत नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता पण तो सफल झाला नव्हता त्यामुळे तिचाही इलाज नव्हता.
         त्यावेळी औरंगाबादसाठी मनमाडला गाडी बदलावी लागे कारण औरंगाबादच्या पुढे मीटर गेज रेलवे होती. पुढे मनमाडहून सिकंदराबाद, किंवा काचीगुडाला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसावे लागे आणि तेथून तीन चार तासात गाडी औरंगाबादला पोचत असे.
             औरंगाबादला गाडी पोचली तेव्हा पहाटेचे साडेचार पाच वाजत होते आणि तो फेब्रुवारी महिना असल्यामुळे अजून अंधाराच साम्राज्य सगळीकडे पसरलेले होते.   स्टेशनच्या बाहेर पडून डोकावून पाहिले तेव्हा समोर आणि दोन्ही बाजूनी एवढा अंधार पसरला होता की शहर कोणत्या बाजूस आहे हेसुद्धा समजत नव्हत अखेरीस स्टेशनवरील हमालाला विचारले आणि त्याने दाखवलेल्या दिशेने चालू लागलो. बाहेर काही टांगे उभे होते त्यातल्या एका टांगेवाल्याने " कहां जाना है साब" असे हटकले. औरंगाबादची अजून निजामी अमलातून पूर्णपणे मुक्तता झालेली दिसत नव्हती. (म्हणजे  त्यावेळी महाराष्ट्रात मराठीचाच वापर जास्त व्हायचा त्यामुळे हिंदी बोलणे जरा अवघड वाटायचे) टांग्यात चढलो आणि एकाद्या लॉजमध्ये उतरावे असा विचार केला कारण अशा वेळी बापटसाहेबाना त्रास देणे योग्य नव्हते. टांगेवाल्यासच विचारले आणि त्याने सांगितलेल्या लॉजकडे टांगा न्यावयास सांगितले. थोडे अंतर गेल्यावर मिणमिणते दिवे जळत असलेली हॉटेले दिसू लागली. लोड शेडिंग नसतानाही लोक विजेचा वापर फारच काटकसरीने करत असल्याचे भासले. थोडी अशी हॉटेले संपल्यावर पुन्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोकळीच जागा दिसत होती असलीच तर शेते असावीत.. जेमतेम  दोन वाहने शेजारून जाऊ शकतील एवढीच रस्त्याची रुंदी होती. थोड्या वेळाने डाव्या बाजूस एकादी वसाहत असावी असे वाटले आणि ती आदर्श कोलनी होती असे कळले. जवळच फायरब्रिगेड दिसत होते.
          पुढे एक दोन मोठ्या इमारती दिसू लागल्या. एका मोठ्या इमारतीकडे बोट दाखवून टांगेवाला सांगत होता, " साब ये पोलिटेक्निकल कॉलेज’ म्हणजे हेच आमचे कार्यक्षेत्र होते तर. थोडे पुढे गेल्यावर आता जो भाग आला तो उस्मानपुरा अशी माहिती मिळाली. पुण्यात जशा पेठा असतात तसे येथे पुरे असतात. औरंगजेब या शहरात वास्तव्य करून राहिल्यामुळे औरंगपुरा पुढे होताच. अर्थात तो नंतर पहायला मिळाला. त्यानंतर एक जरा बऱ्यापैकी मोठा चौक लागला.. तेथील उद्यानात १८५७ सालच्या स्वातंत्र्यसंग्रामाची स्मृती  म्हणून एक स्तंभ उभारण्यात आलेला होता, आणि अजूनही आहे. म्हणून त्याला क्रांतीचौक म्हणायचे. त्यानंतर दोन्ही बाजूला थडगीच थडगी होती तो भाग मुस्लिम वक्फच्या ताब्यात असलेला भाग होता. आणि त्यापुढे गेल्यावर एक नवीन वसाहत होती   तिला नूतन कॉलनी म्हणतात असे कळले. तेथून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा दरवाजा लागला त्याला पैठण गेट म्हणतात असे कळले. औरंगाबादच्या सीमा बंदिस्त करणारे असे दहाबारा दरवाजे तरी आहेत. पैठण गेट पैठणकड तोंड करून उभे आहे आणि त्याच्या शेजारीच मला टांगेवाल्याने उतरवले, " देखो साब, आया महाराष्ट्र लॉज". केवळ या नावामुळे त्यावेळी प. महाराष्ट्रातून येणारी सगळी मंडळी बहुतेक या लॉजमध्ये उतरत असावीत. लॉज आजही अस्तित्वात आहे पण त्याचे पूर्ण स्वरूप आणि नावसुद्धा बदलले आहे.
             लॉजमध्ये आत शिरल्यावर दोन बाजूस खोल्या होत्या आणि दारातच उजव्या बाजूस जेवणघर होते. लॉजच्या मालकाने मला एका खोलीतील एक कॉटचा ताबा दिला आणि माझ्याकडून  अनामत म्हणून काहीतरी दहा पंधरा रुपये घेतले.तेथे महिनामहिना राहणारेही काही पाहुणे होते, पण मला तसे राहावे लागणार नाही अशी खात्री असल्याने मी त्याविषयी काही चौकशीही केली नाही. माझे सामान म्हणजे जी एक बॅग होती ती मला दिलेल्या कॉटखाली ठेऊन प्रातर्विधी आटोपून मी लगेचच बापटसाहेबांच्या घरी जाण्याच्या उद्देशाने बाहेर पडलो. त्यांचा उस्मानपुरा हा भाग आम्ही स्टेशनवरून टांग्यातून येताना मी पाहिलाच होता त्यामुळे मी परत उलट्या दिशेने चालत त्यांच्या घरी जाऊ शकतो याविषयी मला खात्री होती. त्यावेळी औरंगाबाद इतके लहान शहर होते की बहुतेक ठिकाणी चालत जाणे सहज शक्य असे याविषयी सर्वच औरंगाबादकरांना खात्री असल्यामुळे त्यावेळी एकच बस गावात धावत असे ती स्टेशनवरून निघून गुलमंडी या गावातील मध्यवर्ती भागात जात असे हे अंतर जास्तीतजास्त पाच किलोमीटर असेल.
           माझ्या अपेक्षेप्रमाणे दहा पंधरा मिनिटात मी बापटसाहेबांच्या घरी पोचलो. आणि त्यांना मी औरंगाबादला आल्याची सुवार्ता दिली. ते राहत असलेला उस्मानपुरा भाग त्यावेळी त्यामानाने नवीनच होता त्यामुळे त्या भागाला नवा उस्मानपुराच म्हणत. अगदी तुरळक घरे होती.. बापटांचे घर म्हणजे बराच मोठा वाडाच होता. फाटकातून आत प्रवेश केल्यावर मोठे पटांगण होते त्यात एक औटहौसवजा भागात त्यांची अवजारे पडलेली असायची. सकाळच्या वेळी त्यांचे नेहमीचे कामकरी त्या पटांगणात बसायचे आणि त्यांना अवजारे देऊन निरनिराळ्या कामावर पाठवण्यात यायचे. बापटसाहेबांचे पिताश्री वय वर्षे ऐंशी अजून तब्येत ठणठणीत. तेच बापट  कॉंट्रॅक्टर म्हणून औरंगाबादेत प्रसिद्ध होते. आता त्यांची मुले हळूहळू त्यांच्या कामाचा भार संभाळू लाग्ली होती, तरी सकाळी मामा बापट उत्साहाने मजुरांशी वार्तालाप करून कोठे काय वालले याची माहिती घेत आणि पुढे काय करायचे याच्या सूचना देत. मला भेटलेले त्यांचे दोन नंबरचे चिरंजीव. त्यांना सगळे अण्णा म्हणून ओळखत तर त्यांचे मोठे बंधू दादा म्हणून ओळखले जात..
            अण्णानी माझे स्वागत करून त्यांच्या घराच्या पाठीमागेच त्यांचे काही मित्र राहतात त्यांच्या खोलीत अजून एक व्यक्तीस ते घेऊ इच्छितात असे सांगितले. त्या क्षणाला तरी मला दुसरा काही पर्याय आहे असे वाटले नाही आणि निदान खोली आणि तेथील व्यक्ती कशा आहेत ते तरी पाहावे असा मी विचार केला, आणि अण्णासाहेबांच्या बरोबर त्यांच्याच बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या वाड्यात प्रवेश केला. या वास्तूला भोरे बंगला असे नाव होते. भोरे या आडनावाच्या वकीलानी या भागात बरीच  स्थावर मालमत्ता संपादन केली होती. आम्ही ज्या वाड्यात प्रवेश केला त्याच्या बरोबर समोरच आणखी एक असाच वाडा त्याच्या मालकीचा होता, शिवाय गावात अगदी मध्यवस्तीत त्यांचा राहता बंगला होता. या सर्व मालमत्तेची मालकी आता वकीलसाहेबांच्या  मुलीकडे होती आणि तिने त्याची देखभाल करण्यासाठी एक मुनीम ठेवला होता. हे मुनीमजी देखभाल म्हणजे फक्त महिन्यातून भाडे वसूल करण्याचे काम करीत..
           बंगल्याची बाहेरील भिंत बरीच पडकी होती त्यामुळे त्याला फाटक नावापुरतेच होते.   उघड्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोर एक बंगला होता. त्याच आवारात उजव्या बाजूस आणखी एक तसलाच बंगला होता. या दोन बंगल्यांच्या मागील बाजूस दोन औटहौसेस होती. त्यापैकी समोरील बंगल्याच्या औटहाउसमधील डाव्या बाजूच्या दोन खोल्यांमध्ये अण्णासाहेब मला घेऊन गेले. या दोन खोल्यातील तीन व्यक्तींनी आमचे स्वागत केले. अर्थात ते अण्णासाहेबांचेच दोस्त होते.
" या या अण्णासाहेब, आज अगदी सकाळी सकाळी आमच्याकडे मोर्चा "त्या तीन व्यक्तींपैकी जरा गोंडस गोरटेल्या व्यक्तीने हसत हसत बापटांचे हात पकडून त्यांना खुर्चीवर बसवत म्हटले. " पांडेसाहेब, तुम्हाला सांगितल होत ना आमचे एक मित्र येताहेत म्हणून ते आलेत बघा आज, हे कुलकर्णी आणि  बर का कुलकर्णी, हे पांडे, हे एस. टी. मध्ये ज्यू. सिव्हिल इंजिनियर आहेत. " बापट उत्तरले त्यानंतर दुसऱ्या किडकिडित उंचेल्या व्यक्तीकडे अंगुलिनिर्देश करीत " हे माटे, हे ऍग्रिकल्चर खात्यात आहेत, " आणि तिसऱ्या व्यक्तीकडे पाहून, "हे आहेत शिराळी हे पोलिटेक्निकला शिकतात. "
" आणि बरका मित्रानो, हे आहेत कुलकर्णी, नुकतेच इथल्या पोलिटेक्निकमध्ये लेक्चरर म्हणून आलेत. " माझी ओळख अशी त्या तीन व्यक्तींशी करून देत बापटांनी आपला तेथे येण्याचा उद्देश जाहीर करत म्हटले," यांना तुमचे चौथे पार्टनर म्हणून यायचय! "
" मग येऊद्यात की  काय वासुदेवराव? " त्यातील उंच किडकिडीत म्हणजे माटे उद्गारले
" म्हणजे तशी आमची काही हरकत नाही" पांडे बोलू लागले " त्यांना टर्म्स अंड कंडिशन्स सांगितल्यात ना? "
" काय पांडे, अशा काय अगदी टर्म्स अंड कंडिशन्स आहेत, ते भाडे शेअर करतील आणि ते आणि माटे एका खोलीत  झोपतील आणि तुम्ही आणि शिराळी दुसऱ्या खोलीत! यात काय विशेष आहे का? सगळ्यात अगोदर तुम्ही अंघोळ करून तुमची पूजापाठ कराल आणि मग बाकीचे आपापल्या सोयीने करतील येवढेच ना? काही काळजी करू नका" बापटांनीच माझ्या वतीने उत्तर दिले. आणि मी त्या दोन खोल्यातील चौथा भागीदार झालो.
         आमच्या या भागीदारांपैकी माटे सदैव फिरतीवर असायचे. डिपार्टमेंटची जीप त्यांच्या दिमतीला असायची त्यामुळे महिन्यातून पंधरा दिवस ते फिरतीवर आणि त्यांचे कुटुंब पुण्यात असल्यामुळे शनिवार रविवार ते पुण्याला राहण्याचा प्रयत्न करायचे. शिराळी हा विद्यार्थी होता तरी आम्हा दोघाना एकत्र पाहिल्यावर मी विद्यार्थी आणि तो माझा प्रोफेसर असेल असे इतरांना वाटण्याची शक्यता होती अशी त्याची वागण्याची तऱ्हा होती. पण तो फेब्रुचारी महिना होता आणि त्याची परीक्षा जवळ आली होती. तो नगरचा असल्याने त्यालाही मधूनमधून नगरला जाण्याची हुक्की यायची. येउन जाऊन मी आणि पांडेच काय ते या खोल्यात जास्त वेळ राहणारे  सदस्य होतो. त्यात पांडे पण कधी फिरतीवर जायचे त्यामुळे शेवटी त्या खोलीचा खरा कायम सदस्य मीच ठरलो. अगदी उंट आणि अरब या कथेचाच प्रकार झाला.
                 थोड्याच दिवसात शिराळीची परीक्षा झाली आणि तोही निघून गेला. आणि त्याच सुमारास माझा धाकटा भाऊ तेथे आला. खरे तर तो त्यावेळी पुण्यात शिकत होता पण आता वडील सेवानिवृत्त झाल्यामुळे घरातील कर्ता पुरुष या नात्याने मी त्याला औरंगाबादला आणून ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. म्हणजे आता परत त्या दोन खोल्यात आम्ही पाचजण झालो पण आमची अडचण होणार हे लक्षात घेऊनच की काय शिराळीने नापास होऊन परत औरंगाबादला न येण्याचा निर्णय घेतला. तो पुढे बऱ्यापैकी कॉंट्रॅक्टर होऊन माझ्यापेक्षाही जास्त मिळवायला लागला असे  कळले. मग आता एका खोलीत आम्ही भाऊ भाऊ आणि एका खोलीत माटे पांडे अशी विभागणी झाली.
              त्याच वेळी मला रेडिओ घेण्याची अवदसा सुचली. रेडिओ ही त्या वेळी चैन या सदरात मोडणारी गोष्ट निदान आमच्या परिस्थितीतील माणसांसाठी होती. कारण मला पगार तीनचारशे रुपयांच्या आसपास होता आणि त्यातील शक्य तेवढे घरी पाठवायला लागावे अशी परिस्थिती होती अर्थातच त्यामुळे अडीचशे रुपयांचा रेडिओ एकदम घेण्याची ऐपत मला नव्हती . आणि त्यामुळे ही कल्पना मी मनातच घोळवत होतो. आजच्या काळात ही गोष्ट हास्यास्पदच वाटेल .अशात पांडे यांच्याशी बोलताबोलता मी हा विषय काढला आणि त्यानी त्यावर एक पर्याय सुचवला, " मग काय कुलकर्णी अस करूया आपण दोघे मिळून रेडिओ घेऊया नाहीतरी या खोल्यातून कोठेही लावला तरी सगळ्यांना ऐकू येणारच अगदी ऐकायचे नाही म्हटले तरी ऐकावाच लागणार " अस त्यानी म्हटल्यावर मला काही बोलणे शक्यच नव्हते आणि अनायासे मला निम्म्या खर्चात रेडिओ घेता येत होता अर्थातच त्या कल्पनेला मी दुजोरा दिला.
          पांडॆ तसे हुषार आणि युक्तिवादात पटाइत त्यामुळे त्यानी पहिल्यांदाच माझ्याकडून वदवून घेतले की रेडिओचा पहिला हप्ता मी भरायचा याशिवाय त्यानी मला बोलता बोलाता सुचवले, " बरका कुलकर्णी, तुमच्या खोलीत तुमच्या भावाला उगीच अभ्यासात व्यत्यय नको म्हणून रेडिओ आमच्याच खोलीत ठेऊया" त्यानी असे कारण दाखवले की मला काही बोलणे शक्यच नव्हते. म्हणजे मी रेडिओ आमच्या खोलीत ठेवायचा म्हटले असते तर मलाच माझ्या भावाच्या अभ्यासाची काळजी नाही असे त्यानी म्हणायला सुरवात केली असती. रेडिओ म्हणायला दोघांचा असला तरी तो खरा पांड्यांचाच असणार होता कारण मला रात्री झोपताना रेडिओ ऐकण्याची इच्छा झाली तर त्यांच्या खोलीत जाऊन ते जागे असले तर रेडिओ ऐकायला मिळणार. असे असले तरी अर्धं त्यजति पंडित: किंवा त्यावेळी औरंगाबादमध्ये फारच वापरली जाणारी " नही मामूसे नकटा मामू अच्छा है।"या उक्तीप्रमाणे सध्या निदान शेजारच्या खोलीत का होईना जाऊन रेडिओ ऐकायला काही हरकत नाही. असा विचार करून मी त्यांच्या बेताला मान डोलावली आणि आम्ही रेडिओ आणण्याच्या मोहिमेवर बाहेर पडलो.
        त्यावेळी औरंगाबादेत रेडिओ आणायला किराणाचावडी या भागात जावे लागायचे, त्या भागात पांड्यांच्या मते नळातला नरिमान अंड सन्स या दुकानात जायचे ठरले. नरिमान आणि त्याच्या शेजारी वॉचलँड अशी दोन दुकाने त्यावेळी रेडिओ गोदरेज कपाटे अशा त्याकाळातल्या भारी भारी वस्तू विकत असत. नरिमानचे बोधचिन्ह नरिमानमधले  पहिले अक्षर न हे नळासारखे दिसायचे म्हणून पांडे त्याला नळातला नरिमान म्हणायचे. त्या दुकानात शिरल्यावर आम्ही दोन तीन मॉडेल्स पाहिली कारण आमच्या बजेटमध्ये बसणारी अशी तेवढीच होती. त्यातले एच. एम. व्ही. चा लिटल निप्पर हे मोडेल २५० रुपयात येत होते. शिवाय नळातल्या नरिमानने ते  किंमत न वाढवता दोन हप्त्यात द्यायचे कबूल केले त्यामुळे पहिला हप्ता १२५ रुपयांचा भरून तो आम्ही लगेच घरी आणला. लिटल निप्पर खरोखरच आकाराने अगदी लहान होता आणि त्यामुळे एका हातानेसुद्धा तो उचलणे शक्य व्हायचे. घरी येतानाच पांडेनी पावशेर पेढे विकत घेतले ते मात्र त्यानी स्वत:च्या पैशांनी घेतले आणि घरात शिरल्यावर त्यांच्या खोलीतील कपाटाच्या वरच्या कप्प्यात त्याला स्थानापन्न केला. एरिअल लावून त्यांनी भक्तिभावाने एक फूल, हळद कुंकू त्याला वाहून पेढ्याचा नैवेद्य दाखवला आणि सर्वांना पेढे वाटून रेडिओचे बटण दाबून त्याचे उद्घाटन केले. बहुतेक ती वेळ संध्याकाळची असल्यामुळे कामगारसभा किंवा अशाच स्वरुपाचा कार्यक्रम चालू होता.
         रेडिओ आमच्या घरात आला खरा पण तसा तो माझ्या सोयीनुसार ऐकायला मिळतच नव्हता. पांडे ‘ऒफीसला गेले की त्यांच्यापाठोपाठ मलाही जावे लागत होते त्यामुळे सकाळी काही विशेष ऐकायला मिळत नसे त्याची उणीव संध्याकाळी भरून काढू म्हणावे तर ऑफीसमधून आल्यावर पांड्यांचे जपजाप्य चालायचे. येऊनजाऊन ते दोन दिवसानी टूरवर गेले तेव्हा माझ्या मनाप्रमाणे रेडिओ ऐकण्याची संधी मला मिळाली. माटे विशेष रेडिओ ऐकत नसत आणि त्यांचा ब्रिजचा अड्डा असल्यामुळे अशा फालतू गोष्टीत त्यांना रस नव्हता त्यामुळे त्या काळात मी रेडिओ आमच्याच खोलीत आणून मनसोक्त ऐकला आणि त्याला त्यांचा काहीच विरोध नव्हता. माझ्या भावाची भूमिका अगदी नि:संगपणाची होती कारण त्याच्यावर अभ्यासाचे ओझे असल्यामुळे तो माझ्या कृतीला पाठिंबा किंवा विरोध यापैकी काहीच करत नव्हता. कदाचित माझ्या या (त्यावेळी भासणाऱ्या) बाहेरख्यालीपणाचा इतका परिणाम त्याच्यावर झाला की त्या बिचाऱ्याने नंतर लग्नही केले नाही मात्र तो उत्तम इंजिनियर झाला.
          दोन दिवस मनसोक्त रेडिओ ऐकून तृप्त मनाने मी कॉलेजला गेलो आणि संध्याकाळी घरी आल्यावर पाहतो तो रेडिओचा मुक्काम शेजारच्या म्हणजे पांड्यांच्या खोलीत हललेला! अर्थात त्याचा अर्थ पांडेसाहेब आले होते. आणि मी त्यांच्यापुढे गेल्यावर काहीच घडले नसल्यासारखे ते नेहमीप्रमाणे माझ्याशी बोलू लागले. त्यामुळे मला जरा बरे वाटले नाहीतर मी रेडिओ हलवल्याचा या शीघ्रकोपी माणसास राग आला तर काय घ्या अशी उगीच भीती मला वाटत होती. कदाचित रेडिओचा पहिला हप्ता मी दिलेला असल्यामुळे सध्या तरी तत्वत: रेडिओवर मालकी माझी असल्याचे त्याना मान्य असेल त्यामुळे त्यानी आपला नारसिंहावतार मला  दाखवला नसावा. पण त्यामुळे माझे धाडस थोडे अधिक वाढून पांडे दौऱ्यावर गेले नसले तरी ते बाहेर गेल्यावरही मी रेडिओ आमच्या खोलीत आणून ऐकायला सुरवात केली. थोडक्यात रेडिओ आमच्या दोन विभागात लंबकाप्रमाणे पण अनियमित गतीने आंदोलू लागला. द्रौपदीला पांच पाडवानी बिनतक्रार कसे नांदवले असेल याचे त्यामुळेच मला खूप आश्चर्य वाटते. महिना संपण्यापूर्वीच या गोष्टीचा निकाल पांड्यानीच लावला. माझ्याशी बोलताना ते म्हणाले, " हे पाहा कुलकर्णी, रेडिओ सारखा या खोलीतून त्या खोलीत हलवण्याचा मला कंटाळा आला आहे, तेव्हां मला असे वाटते की तो तुम्ही घेऊनच टाका, नाहीतरी पहिला हप्ता तुम्ही भरलाच आहे पुढचाही भरून टाका आणि तो तुमच्याच खोलीत राहू द्या, " पांड्यानाही बहुधा रेडिओ ऐकण्यात फारसा उत्साह उरला नसावा. माझी मानसिक तयारी अगोदर झालीच होती ती पांड्याच्या या उद्गारामुळे प्रत्यक्षात येऊन मी पुढचा हप्ता भरला आणि रेडिओ पूर्णपणे माझ्या मालकीचा झाला.
        या छोट्या रेडिओने बराच काळ आमच्या कुटुंबियांची करमणूक केली.