उसंत

आत्ताच तर थांबला होतास   दोन श्वास अनुभवायला
कशासाठी पुन्हा धावतोस    हपापून धापा टाकायला

दोनच तर वेचून झाल्या     कळ्या खोलवर लपलेल्या
अजूनही नाही उमलल्या     तशाच गळणार कोमेजल्या?

घर्मबिंदू नुकतेच वाळलेले    होत आहेत जखमा कोरड्या
कां पुन्हा उडी घेतांत पाउले   आसूरी  यज्ञात कडाडत्या

उंच उभरले वारुळ कणकण    विसावलेली मुंगी संथशी
कशास करते उगाच वणवण   म्हणू दे ना कोणी आळशी

खोवायची पीसे तरी कीती?    जिंकायच्या दिशा अन कीती?
यशोगान कधी कोणी ऐकती?   गातील कां कोणी तव महती?

दिवस हरवला कर्मकांडी     शांत कराया रजनी आली
पुन्हा पेटवू्न धुनी धुरांडी    नीज करंट्या कांरे सांडली?

सूख नव्हे गंतव्य स्थानते    "सुख" नांव ह्या अजब पथाचे
पदोपदी बघ लपून उगवते     शोधून त्या झोळीत भरायचे 

चकवा मुक्त एकदा होउनी      फ़िरायचे कां तुला वनोवनी
आसपास बघ शांत मनानी    आहेच पोहचला तू नंदनवनी