विचार तर कराल...? (अंधारातील अक्षरे-भाग २)

    नरेंद्र दाभोलकर यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्राला 'सुपरिचित' आहे. अंधश्रध्दा निर्मूलनाचे त्यांचे कार्य मूलभूत स्वरूपाचे मानले जावे, असेच आहे. त्यांच्या चळवळींच्या केवळ कार्यक्रमांचीच माहिती समाजाला असते परंतु, त्यांनी या कार्यासंदर्भात काही पुस्तकेही लिहिली आहेत. मराठी साहित्याच्या दालनातील एक निश्चित जागा त्यांच्या पुस्तकांसाठी दिली जावी.  
     भ्रम आणि निरास हे त्यांचे पहिले वहिले पुस्तक. या पुस्तकात दाभोलकरांनी अंधश्रध्देच्या मूलभूत क्षेत्रांची तपासणी वैज्ञानिक दृष्टिकोनांतून केलेली आहे. बुवाबाजी, देव वा भुताने झपाटणे, भानामती, वशीकरण, पुनर्जन्म, ज्योतिषशास्त्र, परामानसशास्त्र ही ती काही क्षेत्रे होत. लेख वाचताना वैज्ञानिक दृष्टिकोनांतून विश्लेषण वाचायला मिळतेच आणि जोडीने त्या क्षेत्राची माहितीही मिळत जाते.
फसविणारे लोक भाबड्या भावनांच्या आधाराने स्वार्थ कसा साधतात, हे लेखांतून दाखवून दिलेले असून स्वतःची बुध्दी जागी ठेवल्यास फसवणूक होत नाही, असा विश्वासही या लेखनातून नकळत निर्माण केला जातो. दाभोलकर सोप्या भाषेतून वाचकाला तर्कशुध्द विचार करायला लावतात.    
     बहिरोबाच्या डोंगरावर नेल्यावरच सापाचे विष उतरते, या समजुतीने ग्रामस्थ एक सव्वीस वर्षांच्या तरूणाला डोंगरावर नेतात. काही उपयोग नाही, हे लक्षात येऊन मग डाक्टरांकडे आणले जाते पण तोपर्यंत तरूण जीव गमावतो. अभ्यास टळावा म्हणून एक मुलगा भानामतीचा आधार घेऊन सर्वांना आपल्या भजनी लावतो....असे बरेच किस्से पुस्तकात आहेत.
    
तर्कशुध्द विचारसरणीचा अतिरेक होतो की काय, अशी भावनाही वाचनातून निर्माण होते. श्रध्दा नावाच्या गोष्टीला मनातून पूर्णपणे दूर केले जाणे शक्य आहे का, असा प्रश्न पडतो.
    
ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत ना.ग.गोरे यांची प्रस्तावना आणि खुद्द दाभोलकर यांचे मनोगत वाचल्याशिवाय पुस्तक वाचूच नये. 
१९८५ सालचे हे पुस्तक या विषयावरील मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. या दृष्टीने या पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राजहंस प्रकाशनाने पुस्तकाची स्वस्त आवृत्ती केवळ पंचेचाळीस रुपयांना प्रकाशित केलेली आहे.