संकटकाळी प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांचे काम फक्त छायाचित्र काढणे/ चित्रण करणे एवढेच असते का?

बॉंबस्फोटाच्या वेळेस अनेक वर्तमानपत्रांमध्ये जखमींची छायाचित्रे छापलेली असतात. वृत्तवाहिन्यांवरही जिवंत चित्रण दाखवतात.  त्याचे बरे वाईट परिणाम तर अनेक होतात.  

पण माझ्या चर्चेचा मुद्दा थोडा वेगळा आहे. त्यासाठी आधी मी आजच्या एका वर्तमानपत्रात पाहिलेल्या एका छायाचित्राबाबत सांगतो.  बॉंबस्फोटात जखमी झालेल्या निरपराध व्यक्तींची ती छायाचित्रे होती आणि खाली लिहिले होते की,

" बॉंबस्फोटात जखमी लोक मदतीची वाट बघत असतांना... "

मला एक प्रश्न पडला की, ही वृत्तपत्रांची व वृत्तवाहिन्यांची छायाचित्रकार मंडळी फक्त स्पर्धेसाठी आणि पैशांसाठी छायाचित्र काढतात का? म्हणजे असे की, हा छायाचित्रकार जर तेथे होता तर त्याने "मदतीची वाट बघत असलेल्या" लोकांचा फक्त फोटो काढला आणि तेथून त्याने काढता पाय घेतला असेल का? त्या लो़कांना मदत केली असेल की नाही? माणूस या नात्याने त्याचे सर्वप्रथम कर्तव्य (फोटो काढण्या ऐवजी) आहे की त्यांना योग्य मदत करणे किंवा कमीत कमी तेथे असलेल्या इतरांना त्यांची मदत करण्यास भाग पाडणे. त्यापेक्षा तो छायाचित्र काढून मोकळा होतो. त्याचे काम त्याने केले. झाले.  

असेच असते का? असेच असेल तर ते योग्य आहे का? काय वाटते आपल्याला याबाबत? काय असतात छायाचित्रकारांच्या मर्यादा? काय असते आतली गोष्ट?