बटाट्याची भाजी

  • मध्यम आकाराचे कांदे ३
  • मध्यम आकाराचे बटाटे ६
  • लसूण दीड-दोन गड्डे
  • ओले खोबरे दीड वाटी
  • फोडणीचे साहित्य, तेल, मीठ
१ तास
तीन जणांसाठी पोटभर

कांदा मध्यम कापून घ्यावा.

बटाटा बारीक (काचऱ्यांसाठी कापतो तसा) कापून घ्यावा आणि पाण्यात टाकावा.

लसूण सोलून व ठेचून घ्यावी.

ठेचलेली लसूण आणि कापलेला कांदा साधारणपणे समप्रमाणात (एक वाटी प्रत्येकी) असावेत.

तीन डाव तेल तापवावे. ते धुरावल्यावर मोहरी घालून लगेच ज्योत बारीक करावी. मग एक मोठी चिमूट मेथीदाणे, दोन चमचे हळद घालावी. त्यात ठेचलेली लसूण घालून ज्योत मोठी करावी, तीन चमचे लाल तिखट घालावे आणि ज्योत बारीक करावी. नीट हलवून घ्यावे. त्यात कापलेला कांदा आणि लगेच बटाट्याच्या फोडी घालून नीट परतावे. तेल सर्व बटाट्याला लागले आहे अशी खात्री झाल्यावर एक वाटी खोबरे घालून परतावे. दोन मिनिटांनी गरजेपुरते मीठ घालून नीट हलवावे. पाच मिनिटे झाकण ठेवावे.

झाकण काढून उरलेली अर्धी वाटी खोबरे घालावे आणि नीट हलवावे. परत झाकण ठेवावे आणि दर पाच मिनिटांनी ते उघडून भाजी हलवावी. बटाटे पुरेसे शिजत येईस्तोवर हे करावे. साधारण पंधरा मिनिटे लागतील.

अर्धा लिटर पाणी उकळवावे. ते शिजणाऱ्या भाजीत घालून मोठ्या ज्योतीवर भाजी पाच मिनिटे रटारटा शिजवून घ्यावी. मग ज्योत बंद करून आणि झाकण ठेवून दहा मिनिटे थांबावे (सर्व मसाला फोडींत भिनण्यासाठी).

(१) या भाजीला रस अंगासरसा असतो. त्यामुळे भातासाठी याचा फारसा उपयोग नाही. घडीची पोळी आणि दाण्याची चटणी (पाककृतीत दाणे कुठेच नाहीत) किंवा खरपूस भाजलेले ब्राऊन ब्रेडचे स्लाईस (लोणी लावून) यांच्यासोबत घेतल्यास बरे.

(२) चिरलेली कोथिंबीर (अर्धी वाटी) वरून पेरल्यास झकास. पण चव जरा हिरवी होईल एवढे ध्यानात ठेवावे.

स्वप्रयोग