एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे पंचाहत्तर हा काळ साधारणपणे सानेगुरूजींच्या विचारांचा मुलांवर परिणाम असण्याचा काळ मानला जावा. राष्ट्रकार्य करणे, आई-वडील व गुरूजनांचा आदर करणे, पैशांपेक्षा समाजाच्या भल्याचा विचार करणे, मनाने सदैव चांगलाच विचार करणे या विचारांचा तो काळ होता. दैनंदिन जीवनात शुभंकरोती म्हणणे, मोठ्यांनी सांगितलेली कामे करणे अशा कृतींचा अंतर्भाव होता. श्यामची आई पुस्तकात सांगितलेले सर्व धडे आचरणात आणण्याचेच संस्कार होत होते.
एकोणीसशे पंचाहत्तरनंतर मुलांवर चित्रपटांचा व विविध चळवळींचा प्रभाव पडला. दूरदर्शनने 'मोलाची' भर घातली. देशापेक्षा स्वार्थ बघावा, हा विचार बळावला. आई-वडील व गुरूजनांचा अनादर करण्याकडे, सामाजिक नियम व संकेत न पाळण्याकडे कल वाढला. बेफिकीरी, मवालीगिरी वाढली. मुलांच्या मनातून कोमलता कमी होऊ लागली. समाज कोमलतेला बावळटपणा म्हणू लागला. जीवनाचा वेग वाढला.
हे सर्वसाधारण निरीक्षण आहे. प्रत्येक मुलाला व मुलीला लागू होणार नाही.
प्रश्न असाः
नव्या शतकात श्यामसारखा कोमल मनाचा मुलगा जन्माला आला किंवा कोमल मनाची मुलगी जन्माला आली तर त्या जिवाचे काय होईल ? तो मुलगा वा मुलगी देशाचा विचार करू लागला वा लागली, जाता-येता आई वडीलांना नमस्कार करू लागली तर समाज त्या जिवाला हसेल ?
नव्या शतकात संवेदनाक्षम मन घेऊन जगणे शक्य आहे ?
नव्या शतकात साने गुरूजींच्या विचारांचे काय होईल ?