कावळे

काल कावळ्यांची
भरली होती सभा
भाषणास मधोमध
डोमकावळा उभा
प्रश्न होता सोपा,
हद्द कुठे ती कोणाची
काही म्हणती, 'नाही
कुणा एकाच्या पप्पांची
एकामागे एक तसे
लागले ते बोलू
जो तो म्हणे, 'माझी.. '
'तुम्ही नका चोच खोलू'
आधी बाचाबाची,
मग त्याची वादावादी
हमरीतुमरीवर आले
काक प्रतिवादी
काव काव करता
काही कावले कावळे
'चर्चा-वर्चा नको,..
लढू.. ' म्हणती बावळे
एक होता शहाणा
फार तो हुशार
माणसापरी भांडू नका,
थोडं ऐका यार
त्यांच्या-आपल्यात
काही अंतर राखुया
मिळे आपणास जे,
ते मिळून खाऊया
राखाडी वा काळा
कोणी कसाही असला
शेवटी तो कावळा
अरे, भाऊच आपला
ऐकूनीया त्याचे
त्यांनी मांडला ठराव
"एकोप्याने राहू
अन करू काव.. काव.. "