सज्जनपूर आणि वळू

नुकताच श्याम बेनेगल यांचा "वेलकम टु सज्जनपूर" बघितला. पिक्चर एकदम झक्कास! नकळत मराठीतल्या वळुशी तुलना झाली. आता चित्रपटातल्या (मुख्यत: तथाकथित व्यावसायिक आणि विनोदी) कल्पनांना फारसं तर्कनिष्ठ दृष्टीनं (लॊजिकली) बघू नये असं म्हणतात. म्हणजेच त्यांचं "चित्रपटीय स्वातंत्र्य"(सिनेमॅटीक लिबर्टी) जरी मान्य केलं तरी या दोन विनोदी चित्रपटांच्या विषय व पात्ररचना यांबाबतीत मला काही निरीक्षणं नोंदवावीशी वाटतात.

"वळू" काही अंशी उगीचच "गावच्या लोकांचे व गावातल्या वातावरणाचे थटटास्पद चित्रण" असल्यासारखा वाटतो. आता काहींच्या मते उपहासात्मक विनोद हाच तर अशा विनोदी चित्रपटांचा गाभा असतो. पण विनोद परिस्थितिजन्य असेल तर जास्त भावतो. शिवाय वळुमधली पात्रे काहीशी संदर्भहीन व उथळ म्हणजेच वळुला पकडण्यासाठी पकडून आणलेली गर्दी असल्यासारखी वाटतात. "वळू" मध्ये मुख्य विषय धर्माशी निगडित असूनसुद्धा, विषयाची धार्मिक बाजू काहीच धुंडाळलेली दिसत नाही. वळुबद्दलच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा, यांमधला संघर्ष असे परिमाण कथेला देता आले असते. धर्माशी निगडित असलेलं एकमेव पुजाऱ्याचं पात्र विदूषकाच्या पातळीवर आणून ठेवलं आहे. गावकऱ्यांना त्या वळुचा होणारा त्रास हा चित्रपटात कुठचं प्रकर्षानं जाणवत नाही. दिग्दर्शक म्हणतात त्याप्रमाणं "एखाद्याच्या स्वातंत्र्यावर उगीचच निर्बंध लादण्याची मॊब सायकॊलॊजी" (नेमकं माहीत नाही, असंच काहीसं चू. भू. दे. घे. ) हेसुद्धा त्या प्रकर्षानं जाणवत नाही. पडद्यावर जे प्रामुख्यानं दिसतं ते म्हणजे त्या वळुला पकडण्यासाठी आणि त्यानिमित्ताने प्रसिद्धी मिळवण्यासाठी (डाक्युमेंट्री) गावकऱ्यांची चाललेली आचरट धडपड आणि त्यामध्ये डोकावणारं विनोदी राजकारण. दिग्दर्शकांच्या मताप्रमाणचा विषयाचा सीरियस दाखवणारी दोनचं पात्र, वळुच्या बाजूनं असलेली, जीवन्याची आई आणि वेडी. पण तीसुद्धा त्या धरपकडीच्या जत्रेत हरवल्यासारखी वाटतात.

त्यामानाने "सज्जनपूर" गाव बहुरंगी आणि बहुढंगी आहे. गावातल्या ग्राम्यजीवनाच्या सर्व अंगांना, म्हणजेच राजकारण (सरपंच निवडणुक), धर्म (महंमद), जातपात (अहिरवार-जमीनदार), श्रद्धा-अंधश्रद्धा (कुत्र्याशी लग्न, देवाचं पत्र), अलुते-बलुतेदारांची वाताहत (सपेरा), नोकरीसाठी शहरवासी झालेल्या कुटुंबांची दुरवस्था (कमला, मौसी) इत्यादी सगळ्यांना, (पुसटसे का होईना) स्पर्श करण्यात "सज्जनपूर" यशस्वी होतो. तेही कुठल्याही अंगाबद्दल प्रचारकी न होता. गावातली सगळी पात्रं खूपच खरीखुरी वाटतात. पात्रांची सुष्ट-दुष्टं रुपं आहेत. महादेव ह्या मध्यवर्ती पात्राभोवती चित्रपट फिरता ठेवला आहे आणि बाकी पात्रे ठराविक उद्देशानेच पडद्यावर येतात. तरीही सगळी पात्रे गावच्या रचनेतील त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यात व गावचे वास्तववादी चित्र पूर्ण करण्यात यशस्वी होतात.

आता चित्रपट म्हणून "सज्जनपूर" वातावरणनिर्मितीसाठी (गाण्यांच्या भडिमाराबरोबर) खूप वेळ घेतो, ज्यामुळे चित्रपटाच्या पूर्वार्धात प्रेक्षकांचा काहीसा रसभंग होतो.