दहा तास बसमध्ये बसून बुड दुखायला लागलं होतं. पावसानेही कृपा केली त्यामुळे चहा-नास्ता चहा-नास्ता करून लगेच फिरायला बाहेर पडता आलं. आदी शंकराचार्यांनी जिथे तपस्या केली ती गुहा, अडीच हजार वर्ष जुना कल्पवृक्ष, स्फटिकाचे शिवलिंग, नृसिंहमंदिर बघितले. भविष्य बद्रिचेही तिथे देऊळ आहे. ह्या मूर्तीचे मनगट हळूहळू बारीक होतंय आणि ज्या दिवशी पंजा गळून पडेल त्यादिवशी बद्री विशाल नामशेष झालेलं असेल अशी आख्यायिका आहे. ही सगळी देवळं बघून येत नाही तो जेवणाची वेळ झाली. जेवणानंतर ओरिएंटेशन व विदाऊट फायर कॅंप फायर. टिमले, कृष्णा स्वाती, स्मिता रोहिणी ह्या गायक मंडळींच्या सुरात माझ्या सारख्या(अ)सुरांनीही सुर मिसळले. संदीपच्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव ( विमान हुकल्यामुळे झालेली तारांबळ व एका पँट-शर्टवर पूर्ण केलेला ट्रेक), गाणी, गझला जोक ऐकता ऐकता रात्रीचे अकरा कधी वाजले ते कळलंच नाही.
रोजच्याप्रमाणे मला पहाटे पाचलाच जाग आली आणि सहजच खिडकीतून बाहेर बघितले. पहाडांवर धुकं पसरलेलं होतं. त्या धुक्याची जी आकृती तयार झाली होती ती काल गुप्ता सरांनी सांगितलेल्या स्लीपिंग ब्युटी सारखीच वाटत होती. एका कुशीवर झोपलेली स्त्री व तिच्या कंबरेवरून टाकलेला हात अगदी स्पष्ट दिसत होता. लगेच अंजू, सोनल, प्रतिभाला उठवून क्यामेरा सेट करेपर्यंत आकृती नाहिशी झाली पण काल रात्री बघितलेला दिवा मात्र घळीत तेवत होता. जवळपास एकही विजेचा खांब नव्हता. कुठेही पायवाट दिसत नव्हती. तिथे जाऊन कोण दिवा लावत असेल? रोज त्याच जागी तश्शीच धुक्याची आकृती कशी काय तयार होते? हिमालयात गूढ, अदभुत अनुभव येतात हे खरं वाटायला लागलं. तयार होऊन ट्रेकच्या रंगीत तालमीसाठी निघालो. नाश्ता करून, दुपारच्या जेवणाचे डबे भरून 'औली' करता निघालो. नितांत सुंदर ठिकाण 'औली' मी ह्यापूर्वीही बघितलं होतं. तेव्हाच ठरवलं होतं की एकदा इथे आणि खज्जियारला (हिमाचल)बर्फ असतांना यायचं पण तो योग अजून आला नाही बघू कधी येतो ते. ह्यावेळेला बंद डब्याच्या ऐवजी खुर्ची रोपवेनी जायचं आम्ही आठ जणांनी ठरवलं. औली गावापर्यंत सुमो, तिथून स्टेशनपर्यंत पायी, आठव्या टॉवरपर्यंत चेअर रोपवे व तिथून शेवटच्या (दहाव्या) टॉवरपर्यंत पायी असा जरा द्राविडी प्रकार होता पण एक वेगळाच अनुभव होता. दाट धुक्यातून विहार करताना 'पंछी बनू उडके फिरू मस्त गगनमे' प्रत्यक्षात उतरल्या सारखं वाटत होतं. जसं जसं वर जात होतो तर वाटत होतं 'आज मैं उपर आसमाँ नीचे'. थोडं धुकं विरळ झाल्यावर समोर बघितलं तर असं वाटत होतं की जणू एक पर्वत रागांचा वॉल पेपरच लावलाय की काय! हे दृश्य डोळ्यात साठवून घेत नाही तो उतरायची वेळ आली. समोरचा नजारा बघून डोळे विस्फारल्या गेले. पाईनच्या गर्द पर्वत रांगा, हिरवी हिरवी गार कुरणं! बरं झालं डोळ्यात साठवून ठेवायला युजीबी(अनलिमिटेड जीबी) चीप आहे म्हणून! आजही डोळे मिटले की जस्सच्या तसं चित्र डोळ्यासमोर तरळायला लागतं आणि नकळत चेहरा उजळून निघतो.
थोड्यावेळ तिथे थांबून परतीची वाट पकडली. आठव्या स्टेशनवर जेवण करून सुमोची वाट बघत बसलो. गाडीची वाट बघून कंटाळून आता चालायला सुरुवात करावी की काय असा विचार करत नाही तोच गाडी आली. ड्रायव्हर कम गाईड दिसायला खूप गोरा पान , खूपच उत्साही आणि बडबडा होता. छान ठेक्यातली गढवाली गाणी लावली होती त्या गाण्यांचा अर्थ समजावून सांगत होता. वाटेत त्याने त्याच्या बागेत नेले. आयुष्यात पहिल्यांदाच एवढी लदबदलेली सफरचंद, नाशपती व जरदाळूची झाडे बघून वासलेला 'आ' लवकर मिटेचना/ डोळेच दिपले. झाडावरची फळे तोडून खाण्याची मजा काही औरच ! कैक वर्षांनी ही मजा अनुभवता आली. बंद रोपवेनी गेलेला ग्रुप व आम्ही एकाच वेळेला पोचलो. थोडा वेळ हाताशी होता मग काय तपोवनाला जायची टूम निघाली. सगळी उत्साही मंडळी झाली तय्यार. धबधबे, नद्या. हिरव्यागार पर्वत रांगांमध्ये तपस्या करायचं ठिकाण म्हणजे 'तपोवन'. छानसं एक देऊळ व बाजूला एक तप्त कुंड आहे. थोडा वेळ तिथे घालवून निघालो.
दुसऱ्या दिवशी निघायचं होतं गोविंदघाटसाठी (जोशीमठ - गोविंदघट अंतर १३ किमी) जिथून पुढे खरा ट्रेक सुरू होणार होता. सकाळी सहाच गेट (वाहतूक नियंत्रित राहावी म्हणून ठराविक वेळी ठराविक वाहनं सोडतात) मिळावं म्हणून लवकरच निघालो. गोविंदघाटलाही पावसाने स्वागत केले. जोशीमठला घेतलेल्या १० रु.च्या अंगावर बरसाती , हातात १० रु काठ्या व पाठीवर बॅग अशी आमची स्वारी निघाली. खेचर, कंडी, पिट्टुवाले मागे लागत होते पण आमच्या चेहऱ्यावरचा चालायचा निश्चय वाचून अखेर त्यांनी पिच्छा सोडला. उबडखाबड खेचरांच्या शेणाने माखलेला रस्ता, धबधबे, आईये बहनजी निंबू शरबत पिजीये, गरमागरम पराठा, मॅगी खाईये आग्रहाने बोलावणारे धाबेवाले ह्यावर मात करत आमची आगेकूच सुरू होती. "वाहे गुरू सतनाम बेटी अब थोडासाही बचा है", असे मनोबल वाढवणारे तर "पुढे रस्ता खूप अवघड आहे घोडा करा अजून पुष्कळ अंतर आहे" व्ह्याय डोंट यु हायर पोनी, ऍटलिस्ट हायर अ पोर्टर" अश्या खच्चीकरण करणाऱ्या महाभागांना चुकवत पायदौड सुरू होती. सकाळी आठ वाजताचे निघालेलो चार वाजले होते आणि अजून काही अंतर बाकी होतं चालून चालून थकलो तर होतोच पण चालायचा कंटाळाच आला होता. एका वळणावर विश्रांती घ्यायला थांबलो तेवढ्यात समोरून असलम व रविसर येतांना दिसले. "वेलकम! कॉग्रेश्युलेशन! वेलडन दोघांनीही आमचे कौतुकाने स्वागत केले. "थँक्यू सर! लेकीन अब चला नही जा राहा. घोडा मिलेगा क्या सर? " "अब तो आप पहुंचही गयी है. वो सामने पिले रंग का हॉटेल दिख राहा है ना बस वही तक तो जाना है. " लेकीन सर ये बॅग लेके अब चला नही जाता" मी आशाळभूत नजरेने सरांकडे पाहत म्हटलं. 'लाईये मैं आपकी बॅग पकडता हुं' असं म्हणतील असं वाटलं. पण कस्सच काय! माझं वाक्य ऐकलं न ऐकल्यासारख करत दोघेही जण पुढे चालू लागले. आता दुसरा काही पर्याय नसल्यामुळे चालू लागलो. अखेर पिले रंगके हॉटेलवर पोचलो.आधी पोचलेल्यांनी टाळ्यांचा कडकडाटात स्वागत केलं. क्षणात थकवा तर नाहीसा झालाच पण इतका आनंद झाला की असं वाटलं जणू आम्ही माउंट ऐव्हरेस्टच काबीज केलंय.