आम्ही मिळून सातजणींनी जिवंतपणी स्वर्ग पाहिले (बाय द वे स्वर्गाचे अनेकवचन काय होते). स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणे पण ह्याची देही ह्याची डोळा स्वर्ग पाहिला आणि तोही आपल्या मातृभूमीवर. खूप वाचलं, ऐकलं होतं ह्या स्वर्गाबद्दल. स्वप्न होतं हा स्वर्ग बघण्याची. ह्यावर्षी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकलं ते युथ हॉस्टेल युपी स्टेट ब्रँचच्या आयोजकांमुळे. बऱ्याच मैत्रिणींनी तुझ्याबरोबर आम्हालाही तुला न्यायचंच आहे अशी प्रेमळ धमकी देऊन ठेवलेली होती. हो नाही करता करता सातजणींनी फॉर्म भरले. दोन अडीच महिने आधी ठरवून ठेवलेला बेत पार पडेल की नाही ह्याबद्दल प्रत्येकजणीच्याच मनात शंका होती. पण सातीच्या सातीजणी जेव्हा स्टेशनवर भेटलो तेव्हा आनंद ओसंडून वाहत होता आणि आपल्या भाग्यावर खूश असल्याचा भाव लपवू शकत नव्हत्या. नवऱ्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद.... वेगळाच?
आम्ही सातीजणी अश्या प्रकारच्या ट्रेकचा अनुभव पहिल्यांदाच घेणार होतो. आमची एक मैत्रीण जी मागच्यावर्षी ह्याच ट्रेकला जाऊन आली होती तिने आम्हाला छान माहिती आणि बरोबर घेऊन जायच्या सामानाची यादी दिली. सारखं एकमेकींना भेटणं, खरेदी करणं, पायी सेमिनारी हिल्सला फिरायला जाणं अशी जय्यत तयारी सुरू होती. सगळ्याच अचंबित व रोमांचित होत्या ह्या सगळ्या प्रक्रियेत असलेल्या नवऱ्यांचा पाठिंबा व सहभागामुळे.
अश्यातऱ्हेने दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या ट्रेकला जायची वेळ येऊन ठेपली. गाडी पहाटे ३. ४५ ची होती. डबे, बॅगा भरा, अगं हे घेतलं का ते घेतलं का ची फोनाफोनी ह्यात तीन केव्हा वाजले ते कळलंच नाही. चोवीस तासाचा प्रवास गप्पांच्या मैफिलीमुळे अजिबात कंटाळवाणा वाटला नाही. आमच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे गाडी लेट झाली अन तीनच्या ऐवजी पहाटे पाचला हरिद्वारला पोचलो.
थेट धर्मशाळेत जाऊन आन्हिकं उरकून 'दानापानीत' नाश्ता करून हरिद्वार फिरायला निघालो. शांतीभवन, वैष्णोदेवी, भारतमाता मंदिर, पतितपावन मंदिर पाहून जेवणासाठी एक ब्रेक घेऊन हरिद्वारचं खास आकर्षण 'मनसा देवी' कडे निघालो. आदल्या दिवशी सूर्यग्रहण होतं त्यामुळे सगळीकडे प्रचंड गर्दी होती. गर्दी बघून जावं की न जावं विचार करत होतो. जलदगतीने व शिस्तीत पुढे सरकणारी रांग बघून तिकिटे काढली. केवळ सात मिनिटाचा हा एक छानसा रोपवेचा प्रवास होता. बऱ्याच इतर देवी-देवतांच दर्शन घेत मनास देवीपर्यंत पोचावं लागतं आणि तिथले पुजारी पाठीत जोरात धपाटा घालत, टिळा लावत आशीर्वाद देत असतात. हे सगळं चुकवत, गर्दीतून वाट काढत कसंबसं देवीच दर्शन घेतलं. सात वाजताच्या गंगाआरतीकरिता सहा वाजल्यापासून जागा पकडून बसलो होतो. पाचमजली पंचारती व गंगेत सोडलेल्या द्रोणाच्या दिव्यांच्या आरतीचा हा अपूर्व सोहळा! नास्तिकालाही आस्तिक करून टाकणारा, भक्तिरसात डुबवून टाकणारा! इतकं पवित्र स्थान , पण तितकंच गलिच्छ गाव बघून आलेली उदासीनता केव्हा पळाली कळलंच नाही.
'चोटीवाल्याकडे' जेवून धर्मशाळेत आलो. चोवीस तासांचा प्रवास व दिवसभराच्या दगदगीमुळे केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. दुसऱ्यादिवशी सकाळीच ऋषीकेषला निघालो. आज रिपोर्टिंग होतं. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून जेवून लक्ष्मण झुला बघायला गेलो. सात वाजता जेवणानंतर ओरिएंटेशन होतं. आमच्या (ग्रुप व्ही वन) ग्रुपची इतर मंडळीही डेरेदाखल झाली होती. पुढच्या ८ दिवसांचा प्रोग्रॅम व काय सामान न्यायचे, कोणते सामान घ्यायचे, काय काळजी घ्यायची इ... माहिती सांगणे आवश्यकच होते पण अख्यायिकाही सगळ्यांना जांभया येईस्तोवर ऐकवण्यात आल्या. एकूण २६ जणांपैकी महिला(१८) आघाडीवर असल्यामुळे मुंबईच्या नयनाची ग्रुपलीडर म्हणूननिवड करण्यात आली. दुसऱ्यादिवशी जेवणाचे डबे भरून पहाटे पाचलाच जोशीमठला निघालो. साधारण सव्वापाचला उजाडायला लागलं होतं. काय अवर्णनीय दृश्य! ते डोंगर तिरंगी चमकत होते. डोंगरमाथ्यावरती जिथे सूर्याची कोवळी किरणे पडत होती ते निळे, मध्ये हिरवे खाली-पांढरट(धुक्यामुळे)चमकत होते. एका बाजूला अलकनंदा तर दुसऱ्याबाजूला डोंगरकडा मध्ये अरुंद वाट असा हा २५० किमीचा वळणावळणाचा देवप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, नंदप्रयाग, विष्णुप्रयाग पार करत करत जाणारा अवघड प्रवास. अडथळ्याविना पोचलेल्या जोशीमठात पावसाने चिंब स्वागत केलं (ह्या दरड कोसळण्याचे प्रकार नेहमी होत असतात).
क्रमशः