उत्पाती पेंडपाला

  • तूरडाळ--२ वाट्या
  • मेथी दाणे--२चमचे
  • शेंगदाणे कूट--अर्धी वाटी
  • तीळ कूट--पाव वाटी
  • खोबरे[ओले किंवा सुके]--पाव वाटी [सुके खोबरे असेल तर बारीक खिसणीने खिसावे अथवा खिसून मिक्सरवर पूड करावी. ]
  • घिंचेचा कोळ, गूळ
  • गोडा मसाला,
  • लाल तिखट
  • कडिपत्ता, कोथिंबीर
  • फोडणीचे साहित्य
  • मीठ
२० मिनिटे
४ लोकांना प्रत्येकी एक ते दीड वाटी

डाळ धुवून कुकरमध्ये शिजायला लावावी. शिजताना मेथीदाणे घालावेत. डाळ मऊ शिजवावी.

फोडणी करावी. हिंग भरपूर घालावा. कडिपत्त्याची पाने बारीक चिरून घालावीत. म्हणजे खाल्ली जातात.

फोडणी तडतडली की मग हळद घालावी. मग शिजलेली डाळ घालावी. मग त्यात साधारण ८ वाट्या पाणी घालावे.

सगळे नीट हलवून जरा उकळी येवू द्यावी. उकळी आल्यानंतर त्यात शेंगदाणे कूट, तीळकूट, खोबऱ्याचा खीस घालावे. म्हणजे ते सर्व शिजते. ते जरी बारीक असले तरी ते कच्चे असेल तर त्याचा कच्चेपणा जाणवतो. आणि शिजल्यानंतरचा स्वाद वेगळा लागतो.

नंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ घालावा.

गोडा मसाला, लाल  तिखट, मीठ चवीप्रमाणे घालावे.

कोथिंबीर बारीक चिरून घालावी.

दणदणून उकळी येवू द्यावी. खूप घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घालावे. खूप घट्ट नाही पण दाट असा हा पेंडपाला असतो.

यामध्ये लसूणही हवा असेल तर घालू शकतो̮. लसूण वाटून उकळतानाच टाकायचा.

गरम पोळी कुस्करायची त्यावर पेंडपाला घालायचा आणि वरून साजूक तुपाची धार सोडायची. असा हा गरमागरम पदार्थ खायचा.

साजूक तूप ज्यांच्या डाएटमध्ये बसत नाही त्यांना याची खरी चव घ्यायची मजा येणार नाही.

हा पेंडपाला पंढरपूरच्या उत्पात मंडळींचा खास. लग्नाकार्यात होतो पण त्याहीपेक्षा श्रमपरिहाराच्या जेवणात असतो म्हणण्यापेक्षा याचेच जेवण असते.

माझे आजोळ- पंढरपूरचे उत्पात