... पण 'वेळ' आली नव्हती!

विधान परिषदेत कुठलं भाषण करायचं, याची तयारी सुबोध मोहितेंनी सुरू केली होती. शिवसेनेला नामोहरम करण्याच्या युक्त्याही योजून ठेवल्या होत्या. नितीन गडकरींच्या भाषणावर कडी कशी करता येईल, याचा विचार सुरू होता. सगळी जय्यत तयारी झाली होती. विमानही सज्ज होतं. विधान परिषदेच्या उमेदवारीचा अधिकृत फोन आला नव्हता, तरी त्यांना त्याबद्दल खात्री होती.

मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांनी बाकीची 'व्यवस्था' ठीकठाक असल्याचंही कळवलं होतं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीही अर्ज भरण्याची सूचना आली नाही, तेव्हा मात्र मोहिते अस्वस्थ झाले. येरझारा घालत असतानाच फोन वाजला. त्यांनी उत्सुकतेनं घेतला. पण अपेक्षित बातमीऐवजी धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली. विधान परिषदेच्या एकुलत्या एक जागेसाठी कॉंग्रेसनं जळगावच्या मधू जैन यांना तिकीट दिलं होतं. मधू जैन कोण, पक्षात कधी आल्या, मुळात मधू जैन म्हणजे पुरुष की स्त्री, इथपासून शोधाशोध सुरू झाली. सुरेश जैन यांच्या त्या भावजय आहेत, हे रात्री उशीरापर्यंत कळलं.

मोहिते भलतेच नाराज झाले. आपण ज्यांच्या ज्यांच्या म्हणून जवळ आहोत, असं त्यांना वाटत होतं, त्या सगळ्या नेत्यांना त्यांनी फोन लावून पाहिले. कुणी 'आऊट ऑफ रेंज' होते, कुणी 'बिझी' होते, कुणी 'स्विच ऑफ' होते, कुणाचं 'मौनव्रत' होतं... कुणीकुणी तर त्यांचं सांत्वनच करून टाकलं.

विधान परिषदेचं तिकीट गेलं, तसंच मुंबईच्या विमानाचं काढलेलं तिकीटही फुकट गेलं होतं. मोहितेंना डब्बल फटका बसला होता. आपण शिवसेना सोडून चूक तर केली नाही ना, असं त्यांना एकदा वाटून गेलं. प्रयत्न करून काहीच हाती लागत नाही, असं लक्षात आल्यावर ते तशाच अस्वस्थतेत झोपायला गेले.

सकाळी मोहिते आरामातच उठले. तिकीट तर गेलंच आहे, मग कशाला उगाच टेन्शन घ्या, असा एकंदरीत मूड होता. आपल्या नेहमीच्या माणसांना फोन करून त्यांनी मुंबईतली हालहवाल जाणून घेतली. अचानक त्यांचा मोबाईल घणघणला. फोन दिल्लीहून होता.

"काय करताय? " पलीकडून विचारणा झाली.

"काही नाही, पडलोय निवांत. आज कुठे घाई आहे? ''

"अहो मोहिते, तुम्हाला मुंबईला पोचायचंय. ताबडतोब! "

"कशाला? मीटिंग आहे का कुठली? " मोहितेंना काही कळेना.

"अहो, विधान परिषद लढवायचेय तुम्हाला. तुम्हालाच तिकीट मिळालंय...! " फोन कट झाला.

मोहितेंना स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. त्याच धुंदीत असताना विलासरावांचा फोन आला.

"आता तरी झालं ना समाधान? अहो, कॉंग्रेसमध्ये असल्यावर चमत्कारांवर विश्वास ठेवायचा असतो! चला, आता निघा लवकर. दुपारी एकची वेळ आहे... "

मोहितेंनी विलासरावांना धन्यवाद दिले आणि निघायची तयारी सुरू केली. काल फेकून दिलेली आपली भाषणांची फाईल पीएला परत शोधून काढायला लावली. मुंबईचं तिकीट पुन्हा काढलं गेलं. विमानात बसल्यावर मोहितेंची गडबड जराशी थांबली. कारण तिथं हालचाल करताच येत नव्हती. त्यांच्या मनाचं विमान त्याहूनही उंच भराऱ्या घेऊ लागलं होतं...

साडेबाराच्या सुमारास मोहितेंचं विमान मुंबईच्या आसमंतात होतं. त्यांना अर्ज भरण्याच्या ठिकाणी नेण्यासाठी गाड्या तयार होत्या. पण काही वेळ गेला, तरी पायलट विमान उतरवण्याचं नाव घेईना. मोहितेंना काही कळेनासं झालं. तेवढ्यात कप्तानानं सूचना केली - 'राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुंबईत विमान उतरवता येत नाहीये. पंधरा-वीस मिनिटांत जागा मिळेल. तोपर्यंत कृपया प्रतीक्षा करा... '

अवकाशातही मोहितेंना पायाखालची वाळू सरकल्यासारखं वाटलं. सगळं अवसानच गळालं. त्यांनी पुन्हा कालचे सगळे नंबर फिरवले. पुन्हा 'बिझी', आऊट ऑफ रेंज, स्विच ऑफ, इन मीटिंग, अशी उत्तरं मिळाली. हताश होऊन ते आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज झाले.

अखेर विमान उतरल्यानंतर मोहिते कार्यकर्त्यांसह धावतपळत अर्ज भरायला पोचले. माणिकराव ठाकरे समोरच भेटले. "अरे, तुम्ही आधीच? चला, मी आलोय आता! " मोहिते त्यांना म्हणाले.

"चला, आपल्याला प्रचाराला निघायचंच आहे. लगेच नारळ फोडू! " माणिकरावांनी प्रतिक्रिया दिली.

"अहो, आधी अर्ज तर भरू दे! "

"मोहिते, तुम्हाला उशीर झाला. अर्ज भरलाय आम्ही. चला आता... "

"अरेच्चा? माझा अर्ज तुम्हाला कसा काय भरू दिला? "

"मोहिते, तुमचा नाही! मधूताईंचा अर्ज भरलाय. त्यांच्याच प्रचाराचा नारळ फोडायचाय. चला आता! " माणिकराव शांतपणे म्हणाले.

मोहितेंनी घड्याळाकडे पाहिलं. त्यात एक वाजून वीस मिनिटं झाली होती. हताशपणे ते मटकन खालीच बसले. हातातलं घड्याळ काढून ते फेकून देणार, तेवढ्यात माणिकरावांनी त्यांना अडवलं.

मोहितेंना बाजूला घेऊन ते म्हणाले, "अहो, काय करताय? घड्याळ म्हणजे 'राष्ट्रवादी'चं चिन्ह आहे! जळगाव महापालिका निवडणुकीवरून सुरेशदादा जैन आणि राष्ट्रवादीचं भांडण लागलंय. राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय आपल्याला विधान परिषदेत जाता येणार नाहीये. ते आणखी भडकतील असं काही करू नका! "

त्यांनी मोहितेंना मग आपल्यासोबत घेतलं. माणिकरावांच्या हातात हात घालून मग मोहिते मधूताईंच्या प्रचारफेरीत सहभागी झाले...

-----