पहिली दिवाळी

दीपमालिका चहूकडोनी झगमगते दारात चांदणी
भल्या पहाटे सडा घालुनी रंगावलि काढून अंगणी

गर्भरेशमी वस्त्र लेउनी निरांजने ती घेउन हाती
कुंदकळ्यांची प्रभा पसरली खळी खुले आरक्त प्रभाती

कुंकुम भाळी मेंदी हाती, किती वागवी अहेवलेणी
कंकण हाती पायी जोडवी नथ नाकी अन् कुंडल कानी
 
कटाक्ष भोळे भिरभिर डोळे कष्टाने बहु आवरते ती  
क्षणात हसते, बावरतेही पुन्हा धिराने सावरते ती

नाव घेउनी चूर लाजुनी भावसागरा येते भरती
स्वतः भोवती घेते गिरकी चुकार बट ती गालावरती

किणकिण हासत पैंजण वाजत अंगणात साजते नव्हाळी
दीप नाचती सलज्ज नयनी ही पहिली गाजते दिवाळी!