घरटे(४)!!!! सत्यकथा

"माणसाचे जीवन म्हणजे एक कोरी वही असते जिच्या प्रत्येक पानावर आठवणीच्या शाईने तो अनुभव लिहून ठेवतो. बरेचदा खोडातोडिच्या रूपात चुका कागदावर घर करून बसतात. एकदा जे लिहिले ते परत मिटवता येत नाही आणि अर्ध्याहून जास्त भरल्यावर जेव्हा वही मागे पडताळून बघितली जाते तेव्हा या खाडातोडी दुरुस्त करण्याची तीव्र इच्छा होते. कधी सुंदर अक्षरांमध्ये लिहिलेले लेख वाचता वाचता मन त्याच पानांवर घुटमळते. परत,   तसाच एखादा नवीन लेख नवीन पानावर नवीन रीतीने लिहिण्यास मन आरंभ करते. आणि ते वहीचे शेवटचे पान असते........ "

दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी घरी चालली होती. अनूला घेऊन आमची सौ बरेच सामान खरेदी करत होती. सुनेचा पायगुण फारच सगुण ठरला होता. हिच्या पायाचे दुखणे सुनेचा पाय घराला लागताच घर सोडून गेले होते. आधुनिक विज्ञान कदाचित या गोष्टींना पुराव्याअभावी खोटे ठरवेल पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना पुरावे लागत नाहीत तर श्रद्धा लागते. देवाचे अस्तित्व म्हणा, शकुन अपशकुन म्हणा, कुणाचा पायगुण म्हणा. वास्तविक आमच्या चिरंजीवाच्या आणि अनुच्या(हे तिचं सासरचं नाव) लव्ह मॅरेजला माझाच नव्हे आमच्या सौ चा देखिल विरोध होता. नाकापुढे डोळे ठेवून जगणाऱ्या आम्हाला ते सहन होत नव्हते. पण, शेवटी श्रेयसच्या हटटापुढे मान तुकवावी लागली. तरी लग्नानंतर सौ बरेच दिवस सुनेशी बोलत नव्हत्या, मीदेखील मोजकेच बोलत होतो. पण, अनू आल्यापासून मला अंजलीच घरी आल्यागत वाटत होते म्हणून माझा तिच्यावरचा राग मावळला होता. फक्त पुरानपरंपरावादी संस्कारित मन सोमरस प्राशणं केलेल्या वात्सायन कुळात जन्मलेल्या द्विकुलभुशवणाऱ्या या कन्येला सून म्हणून स्वीकारत नव्हते. तिच्या वागण्याने मात्र तेसुद्धा निवळले. एक बाब मात्र मी अनुभवली. ती म्हणजे अनू आल्यापासून माझे घरामध्ये स्थान महत्त्वाचे झाले. माझ्याशिवाय निर्णय घेतल्या जात नव्हते. सौचे सर्व दुखणे दूर पळाले आणि आमचे घर सर्व सुख समृद्धीने परिपूर्ण झाले. कदाचित तिच्या कुंडलीत नवमस्थानामध्ये असणारी चंद्र-मंगळ युती असावी पण, ती आम्हा सर्वांसाठी "लक्ष्मी" ठरली होती यात वादच नाही. या दिवाळीला आमच्याच लक्ष्मीची पूजा करायची हा माझा विचार सर्वांनाच आवडला. फक्त अनू मात्र लाजून बेडरूम मध्ये जाऊन लपली. आमची सौ अशाप्रकारे कधी लाजल्याचे मला आठवत नाही. उलट, डोळे काढून मला निश्चित लाजवले आहे बरेचदा. मी गॅलरीमध्ये बसून सकाळचा चहा घेत होतो. धनत्रयोदशीचा दिवस होता. मला अचानक काही वर्षापूर्वीची दिवाळी आठवली.....

लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. साधारण सायंकाळचे पाच वाजले होते.  रस्त्यावर वर्दळ नेहमीपेक्षा कमी होती. सायनरच्या चाळीतल्या मुलांचे फटाके उडवणे सुरू झाले होते. इकडे बायकांचे अंगण सजवणे सुरू होते. सर्वत्र अंगणामध्ये पाणी घातल्याने म्रुद्बंध उसळला होता. काही ठिकाणी झाडझूड अजूनही सुरूच होती ज्यामुळे धूळ उडत होती. त्यातच भर म्हणजे फटाक्यांची धूळ. मनोज आणि पिंटू त्यांच्या मित्रांचे फटाके बघत होते. त्यांची बहीण चिमु आईने सांगून ठेवल्याप्रमाणे रांगोळी काढत होती. मनोज आणि पिंटु यांच्या निष्पाप चेहऱ्यावरचे ते प्रसन्न हास्य बघून मला त्या मुलांना फटाक्यांमध्ये मिळत नसावा एवढा आनंद मिळत होता.  मी आपले काम सोडून पार्थिव विसरून त्यांचे फटाके उडवणे आणि नंतर त्या फटाक्याच्या धुव्व्यात जाऊन नाचणे बघत होतो.

मनोज बहुदा सहावीत असावा आणि पिंटू चौथीमध्ये. कारण, पिंटू आणि मनोजमध्ये दोन वर्षाचे अंतर आहे हे त्यांच्या आईने आमच्या घरी एकदा सांगितले होते. त्यावेळी ती बाई माझ्या घरी भांडे- कपडे या कामाकरिता येत होती.  पण,  नंतर तिच्याकडे जास्त पगार देणाऱ्या लोकांची वर्णी वाढली म्हणून तिने आमच्याकडे येणे थांबवले होते.   आजही ती जवळच्या मारवाडी कॉलनीमध्ये खास जादा वेतन  मिळणार म्हणून गेली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरी फटाके घेऊन येते असे ती तिच्या तीनही पिलांना आश्वासन देऊन गेली होती.  त्यामुळे ते तिघेही आईची आतुरतेने वाट बघत होते. चिमू, तिची छोटी मुलगी तिसऱ्या इयत्तेत होती. पिंटू सर्वांना "माझी आई खूप मोठे फटाके घेऊन येणार आहे मग आम्ही रात्री खूप फटाके उडवणार आहे" असे सांगत होता.  तर,  मनोज त्याला चूप राहण्यास बजावत होता.  तेव्हा पिंटू "तुला फटाके देतच नाही थांब तू" असे त्याला धमकावत होता.

सहा ते आठ महिन्यापूर्वीचीच गोष्ट होती, मनोजचे कुटुंब वडिलांच्या छत्रछायेखाली होते. त्याचे वडील ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्याची आई त्यावेळी कोठेही काम करत नव्हती. सायनरच्या चाळीमध्ये बहुतांश लोक कमी शिकलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे चुगलखोरी, दुसऱ्यांच्या घरात डोकावून बघणे हे प्रकार जास्त चालत असत. पण, मनोजचे वडील ग्रॅज्युएट झाले होते त्यामुळे त्यांनी इतरांशी
संबंध मोजकेच ठेवले होते.  जवळपासचे बंडखोर मुले मनोजच्या आईकडे घाणेरड्या नजरेने बघायचे म्हणून ती बिचारी क्वचितच घराबाहेर निघत होती. असेच एके दिवशी मनोजचे वडील स्वारी घेऊन जात होते. ती दुपारची वेळ होती. गाडी वर्धेच्या पुलावरून जात होती.
अचानक काहीतरी गडबड झाली आणि गाडी पन्नास फूट खाली नदीत कोसळली. गाडीतले दोघेही जागीच ठार झाले. त्यांना पाण्यात पडूनही
पाणी मागण्याचीदेखील उसंत मिळाली नाही. दोन दिवसांपर्यंत घरी आले नाही म्हणून मनोजच्या आईचे जेवणावरचे लक्ष उडाले होते. मुले रोज "बाबा कुठे गेले? खाऊ घेऊन केव्हा येणार" असा प्रश्न विचारत होते सर्वत्र शोधाशोध झाली पण काहीच पत्ता नाही.  जवळच्या शनी मंदिरात जेव्हा विचारले तेव्हा त्याने घरापासून ईशान्येकडे गेल्याचे सांगितले सोबतच मोठा धोकाही वर्तवला त्यामुळे त्या बाईचा धीर खचला होता. सायंकाळच्या दिवे लावणीच्या वेळी केबल टी. व्ही. वर न्यूजमध्ये तिने वर्धा नदीमध्ये ऍक्सिडंट झालेला ऑटो बाहेर काढताना बघितला.
त्या ऑटोचा नंबर बघताच तिला चक्कर आली.  तिचे आयुष्य उध्वस्त झाले होते. तिला तीन मुलांची जबाबदारी देऊन तिचे जीवन
तिच्यापासून दूर गेले होते.

इकडे सायनरमध्ये "त्या बाईचे बाहेर लफडे आहे म्हणून त्याने आत्महत्या केली" "त्या माणसाने म्हणे ऑटोमधल्या बाईवर जबरदस्ती केली होती झटापटीमध्ये ऑटो उलटला" अशा चर्चा सुरू झाल्या त्यादेखील मनोजच्या आईच्या कानासमोरच. बिचारीला आधीच दुःख त्यात लोकांचे झोंबणारे बोलणे. तिला जीव अगदी नकोसा झाला. पण, मुलांसाठी जगणे आवश्यक होते. त्यातच पिंटुला फीटची आजार एकाएक सुरू झाला.

जीवितासाठी तिला लोकांच्या घरी काम करणे भाग पडले. काही लोक तिला आधार म्हणून तर काही हलकट लोक तिच्या सौंदर्याचे अवलोकन म्हणून तिला जास्त पगार देऊ लागले. तिच्या इमानदारी आणि कामाची कदर मात्र कोणालाही नव्हती. हे सगळं माहित असूनसुद्धा ती दुर्लक्ष करत होती.  तिचा आता नाईलाज होता.  रस्त्यावर टवाळक्या करणाऱ्यांना आता मनमोकळेपणाने तिला टोचणे घालता येत होते आणि त्यांच्या त्या वाग्बाणांपेक्षाही विषारी नजरेला ती नजरांदाज करत होती.  चिंतेमुळे, भीतीमुळे तिची तब्येत खालावत होती.

बऱ्याच दिवसांपासून ती आजारी होती. पण, पैशांच्या अभावी डॉक्टरांकडे जात नव्हती कारण, पिंटुच्या मिरगीमध्येच तिचा बराच पैसा खर्च होत होता. आजही ती थोडी आजारीच होती. सर्व कामे आटपून लोकांनी दया करून दिलेली मिठाई आणि फटाके आपल्या मुलांसाठी घेऊन ती झपाझप पावले टाकत घराकडे येऊ लागली. रस्त्यामध्ये अचानक मोठा फटाका फुटला. त्या आवाजामुळे काही क्षण तिला घाबरल्यासारखे झाले. ती थोडी दूर जात नाही तोच तिला चककर आली आणि ती रस्त्यावरच पडली. त्या मुलांच्या वाटणीची तिच्या हातातली मिठाई जवळच्या सांडपाण्याच्या खड्याने खाल्ली. फटाके विस्तव लागून फुटायच्या आतच विझले. जवळपासच्या बायका जमा झाल्या आणि त्यांनी तिला सरकारी दवाखान्यात नेले. दवाखान्यामध्ये कोणीच नव्हते. फोन करूनही कोणी येत नव्हते. डॉक्टरलोक त्यांची दिवाळी साजरी करत होते. आणि कोणाच्यातरी आयुष्याचे दिवाळे निघत होते. पण, कोणालाही  याची पर्वा नव्हती. बराच वेळ तडफडून त्या बाईची प्राणाज्योत दिवे लावणीच्या वेळी मालवली. येथे मनोज त्याच्या भावंडाबरोबर आईची वाट बघत होता. मारवाडी कॉलनीमध्ये जाऊन त्याने दोन-तीन घरी
आईबद्दल चौकशी केली.  पण,  आई येथून केव्हाचं गेली हे त्याला कळले.  रात्र बऱ्यापैकी झाली होती सर्वत्र फटाक्यांचा आवाज सुरू झाला होता. मध्येच एखादे रॉकेट किंवा झाड वेगळाच आवाज करत होते.

तिन्ही छोटी छोटी मुले दारामध्ये बसून लहानसा चेहरा करून आईची वाट बघत होते. थोड्या दूरून घराकडे एखादी बाई येताना दिसली  की  पिंटू आई फटाके घेऊन आली म्हणून आनंदी होत होता.  पण त्याचा आनंद म्हणजे सागरामधली लाट ठरत होती.  क्षणिक! मी जेव्हा प्रसाद घेऊन त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा बाजूला बोलावून तेथिल एका माणसाने मला घडलेला प्रसंग सांगितला आणि प्रसाद देण्यास मनाई केली.
कारण, मरणाऱ्या घरी प्रसाद दिल्याने लक्ष्मी नाराज होते असे त्या लोकांचे मत होते. त्याच्या घरी कोणीही प्रसाद नेऊन देत नव्हते. मी लगेच त्यांच्या घरी गेलो आणि त्या तीनही मुलांना आईनेच घ्यायला पाठवले म्हणून घरी घेऊन आलो.  सौला सगळा प्रसंग सांगितला. तिला देखिल त्यांची दया आली. त्यांना घरीच जेवू घातले आणि घटना समजताच अंजलीने तिचे सर्व फटाके त्यांना दिले.  ते बघताच पिंटू म्हणाला, "बाबासुद्धा खाऊ आणतो म्हणून एकदा गेले होते अजून नाही आले. आई फटाके आणायला गेली अजून आली  नाही. त्यांना कदाचित खूप त्रास होत असावा,  म्हणून उशीर लागत आहे. मी मोठा झाल्यानंतर आई-बाबांना अजिबात त्रास होऊ देणार नाही. आईसाठी मी नेहमी साडी घेऊन येईन तेदेखील उशीर न लावता. "  त्याच्या या बोलण्याने अंजली आणि सौ दोहोंच्या डोळ्यात अश्रू तरळले.

त्यानंतर दहा दिवसाने सायंकाळी एक मुलगा घरी आला त्याने एक पत्रिका घेतली आणि तिचे एक टोक तोडून ती पत्रिका मला दिली. मी पत्रिकेवर नाव बघितले. अरे हा तर मनोज!  मला नंतर लक्षात आले. त्याचे केशरहित गुळगुळीत डोके बघून माझे काळजात धस्स झाले. त्याने तो धक्का कसा पचवला असेल याची मला कल्पनाच करवत नव्हती. त्या पिंटुचे आणि चिमुचे काय झाले हेदिखिल मी त्याला विचारले नाही.
काही वाईट झाले असल्यास उगाच त्याला त्रास आणि मीदेखील ते कसे ऐकू?

ही एक सत्यघटना आहे मी फक्त नावे पात्रांची बदलली आहेत. या सगळ्या घटनांमध्ये समाजाचा बराच वाटा असतो हे मला त्याक्षणी जाणवले.
कारण, पोस्टमॉर्टमनुसार मृत्यू घाबरल्यामुळे किंवा अतिविचार केल्यामुळे डोक्याची शीर फाटून झाला होता. निश्चितच त्या बाईला सायनरच्या मुलांचीच नव्हे तर ज्या घरी कामाला जाते त्यापैकी काही घरातल्या माणासांचीसुद्धा भीती वाटत होती. अधाशी कुत्र्यासारखे ते तिला पाहत असल्याचे तिने माझ्या सौजवळ अनेकदा सांगितले होते. पण, गरिबीपुढे माणसाचा नाईलाज आहे.