मन वाहत्या पाण्याचे ~~~

डोळ्यांतून झरणाऱ्या मायेचे

गालान्वर ओघळणाऱ्या वेदनेचे

हर्षातून सांडणाऱ्या मोत्यांचे

...मन वाहत्या पाण्याचे ~~~  

क्षणात वाढत्या वर्तुळांचे

मन अविचारी भोवऱ्यांचे

कोसळणाऱ्या प्रपातांचे

खोल अंधाऱ्या डोहाचे

... मन वाहत्या पाण्याचे ~~~

मन रेशमी तरंगांचे

उबदार चमचमत्या किरणांचे

उमलत्या गुलाबी कमळांचे

मन पाकळ्यांतिल दव बिंदुंचे

... मन वाहत्या पाण्याचे ~~~

मन थंडगार हिरवाइचे

शांत क्लांत विहगांचे

चिंब शहारल्या पानांचे

तरंगत्या नाजुक सोनफुलांचे

... मन वाहत्या पाण्याचे ~~~

रिमझिम श्रावण धारांचे

मन खळाळत्या निर्झराचे

उमटून पुसणाऱ्या प्रतिबिंबांचे

सरत्या रम्य किनाऱ्यांचे

... मन वाहत्या पाण्याचे ~~~