गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी (भाग २)

( माझे आजोळ--मागील लेखावरून पूढे चालू )

....गावाजवळच्या विहिरीच्या मळ्यात भाजीपाला, पेरू, केळी लावलेली होती. रोज ताजी फुले व भाजीपाला नोकर घरी घेवून येत. त्याजवळील मारुती मंदिरात सकाळी सकाळी सनईचे सूर वाजत असत. प्रत्येक घरापुढे सडा आणि रांगोळी काढलेली असे. "साध्याही विषयात आशय बहू आढळे.... " या कविवर्य केशवसूतांच्या कवितेची आठवण जरुर होते. मोलकरीण नदीवर कपडे धुण्यास जाई तेव्हा आम्ही दोघी बहिणी तिच्या सोबत जात असू. सकाळची वेळ, झुळझूळ वाहाणारे पाणी. ते दिवसच काही वेगळे.

आजोबांकडे आंबे घरचेच असायचे. एका मोठ्या खोलीत आंबे पिकायला घालायचे. गोटी आंबा, शेपू आंबा, दोडी, शेंद्री, कलमी इत्यादी. त्यामुळे आंबे खाण्याची खुप मजा येई. सगळ्या प्रकारच्या आंब्यांची चव चाखायला मिळे.

सणाला केळीचे पान, पुरणपोळी, तुपाच्या छोट्या वाट्या असत. हिरव्यागार केळीच्या पानावर पांढऱ्या शुभ्र दाणेदार भाताची मूद, त्यावर पिवळेधमक वरण, त्त्यावर शुद्ध गावरान तुपाची धार, दोन भाज्या, लिंबाची फोड आणि मसालेदार कढी असा सगळा मामला होता.

दिवाळीनंतर मळ्यात हुरडा पार्टी व्हायची. तो हिरवागार लुसलुशीत हुरडा बघून तोडाला पाणी सुटायचे. तो भाजून त्यावर तीळ आणि मीठ किंवा साखर. अहा हा! काय वर्णावे!

संध्याकाळी आम्ही सगळे लहान मुले रामरक्षा म्हणत असू. आमची आजी कष्टाला मागे पुढे बघायची नाही. तीला कामचा आळस नव्हता. घरात मोठी असल्याने तीच्यावर जबाबदारी जास्त. घरात कुणाला काय हवे काय नको ते बघणे, पाहुण्यांचे स्वागत, नोकरांकडून कामे करवून घेणे, त्यांच्या अडीअडचणी जाणणे, त्यांना पैशांही मदत करणे. एक प्रकारे ते व्यवस्थापन कौशल्य होते. त्याही काळात आजी कोणत्याही अभ्यासक्रमाशिवाय, न शिकता उत्तम व्यवस्थापन करत असे. तीच्यात त्याग वृत्ती, कष्टाळूपणा, सदाचरण हे गुण दिसून येत.

परत गावाला जायहे म्हणजे आजी बैलगाडीजवळ यायची व आम्हाला गहिवरून म्हणायची, "लवकर या बरं का बाळांनो. "

आता आजी आजोबा हयात नाहीत.

आता एकत्र शेती नाही.

एकत्र कुटूंब नाही. मामांचे मुले, नातू शहरात नोकरी करतात.

पण खरी लक्ष्मी खेड्यातच!

( पुढच्या भागात घेवून येते, भुलाबाईच्या आठवणी. )