गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी (भाग १)

माझे आजोळ

त्या दिवषी पेपरमध्ये वाचले की गांधीजी नेहेमी म्हणत, "खेड्याकडे चला".

मला माझा भूतकाळ आठवला. तो काळ असावा साधारण १९५० ते १९६० दरम्यानचा. माझ्या मामाचे गांव म्हणजे पहूरजिरे. खामगांवपासून ३५ किलोमीटरवर. परीक्षा आटोपल्या म्हणजे आम्हाला वेध लागायचे ते पहूरला जाण्याचे. एक उन्हाळ्याच्या व दुसऱ्यांदा दिवाळीच्या सुटीत.

आम्ही दोघी बहीणी, माझे दोन भाऊ व आई जळगांव जामोदहून खामगांवपर्यंत एसटी ने आणि तेथून खुटाळ्याला मामा बैलगाडी म्हणजे दमणी घेवून यायचे. ती आजूबाजूला हिरवीगार झाडी, निळे डोंगर, झुळझुळ वाहाणारी नदी, पक्ष्यांचा सुमधूर आवाज. वाहनांचा कर्कश आवाज नाही. अगदी निरव शांतता.

दिवाळीच्या सुटीत तर आजुबाजूला ज्वारीची आणि कापसाची पिके दिसत. सर्व सृष्टी हिरवीगार. जणू काही वनदेवतेने हिरवा शालू पांघरलेला आहे, असे वाटायचे. लाल, गुलाबी, शेंद्री, जांभळी अशी विविधरंगी फुले दिसत.

पहूरजिरे म्हणजे एक खेडे. तेथे तेव्हा बस जात नव्हती. ग्रामपंचायत होती. आमच्या आजोबांचा मोठा वाडा होता. समोर बैठकखोली. आजोबा म्हणजे मोठे जमिनदार.  बैल, गायी म्हशी यांनी गोठा नेहेमी भरलेला असे. घरात आजोबांचे दोन भाऊ, त्यांच्या बायका, एक बालविधवा बहीण, भावांची मुले, आजोबांची मुले,  सूना असे एकंदर पंधरा-सोळा जणांचे कुटूंब होते. आमचे आजोबा सर्वात मोठे. त्यामुळे त्यांच्यावर शेतीची व घरची सगळी जबाबदारी असे.

रम्य सकाळ : 

रोज सकाळी आजोबा पाच वाजता उठत. एक नोकर गायी म्हशीचे दुध काढी. आजोबांचे भाऊ दूध मोजून घेत व ते खामगांवला डेअरीत पाठवत. आजी सकाळी अंगणात शेणाचा सडा टाकून रांगोळी काढीत असे. आंघोळ झाल्यावर आजोबा जांभळ्या रंगाचे सोवळे नेसून पूजा करीत. त्यांची बहीण रोज देवाच्या फोटोला हार घालून पूजा करीत असे.  नंतर आजी लसणाची चटणी, ज्वारीची भाकरी आणि लोणचे बांधून शेतावरच्या गड्यांसाठी देई. नंतर आजोबा चहा घेवून गावातल्या मळ्यात जात. आजी एका खांबाला लाकडी रवी बांधून ताक बनवीत असे. नंतर त्यातले काही ताक शेजारी व काही गडी माणसांना दिले जाई...

(क्रमशः)