या देहाच्या समिधेस मी
यज्ञकुंडी झोकले
जे केले ते समजून उमजून
मार्ग मनी खुंटले
नसे तत्व अन धर्म नसे मी
माणूस साधा खरा
निष्पांपांची सरणे जळता
वन्ही चेतला उरा
भले इतिहासी रावण म्हणूनी
लिहीतील माझ्या कथा
महात्म्यांचे वाटसरू ते
कशा जाणतील व्यथा
पळ अंताचा समीप असता
नकोत प्रश्न भोवरे
परिणामांची जाणिव पुरती
मीच मला सावरे
पहाट येता स्वप्ने येतील
अज्ञाताची दिशा
नसतिल बेड्या अन पिंजरे
जळून जाईल निशा