दिवस असे श्रावणासारखे . .

दिवस असे श्रावणासारखे, फुलत यावेत झरण्यासाठी . .

कळत नकळत मनामध्ये

प्रेम असं फुलावं

शब्दांच्या संगतीने

हिरवंपण झुलावं

असा कधी आठवणींचा

नाच व्हावा साजरा

अन गुलाबी ओठांवरती

शब्द व्हावा लाजरा

सांज यावी प्रतीक्षेची

पक्षांच्या संगतीने

डोळे असे डोळ्यांसाठी

तडफडावे जीवघेणे

गाभुळलेले धुके असावे

दिसता दिसता विरण्यासाठी

दंव असावे गवतांवरती

पावलांमध्ये जिरण्यासाठी

दिवस असे श्रावणासारखे, फुलत यावेत झरण्यासाठी ..